Breaking News

परंपरागत शेती सोडून नवीन प्रयोग करण्याची गरज : नितीन गडकरी

नागपूर
शेतक-यांनी गहू, मका, ज्वारी, सोयाबिन अशी परंपरागत पीक घेत राहिल्यास त्यांना फार नफा मिळणार नाही. शेती करून ख-या अर्थाने समृद्ध व्हायचे असेल तर शेतक-यांनी नवीन प्रयोग करण्याची गरज आहे. बांबूची शेती हा नवीन प्रयोग असून त्याद्वारे समृद्धीची दारे उघडतील असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केल. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या अकराव्या अ‍ॅग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.
विदर्भ शेतकर्यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावा, शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, विदर्भातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, शेतकर्याचे उत्पादन वाढावे, नवनवीन तंत्रज्ञानाने शेतीचे प्रगती व्हावी या उद्देशाने 10 वर्षापूर्वी अ‍ॅग्रो व्हिजन सुरु करण्यात आले, असे सांगताना गडकरी म्हणाले की, ते ज्यावेळी काही नवीन गोष्टी मांडतात त्यावर लोकांचा पटकन विश्‍वास बसत नाही. परंतु, प्रयोगातूनच माणसाच्या प्रगतीची वाटचाल होत असते. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था अर्थात ’निरी’ बांबू पासून इंधनाला लागणारे तेल बनवण्याचे संशोधन करीत आहे. हे तेल इंधन म्हणून विमानांमध्ये वापरता येऊ शकते. लवकरच ’निरी’चा अहवाल येणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतक-यांचे जीवनमान बदलण्यास मदत मिळेल. आदिवासी जंगल क्षेत्रात बायो टेक्नॉलॉजीचा वापर करून रतनज्योत, जेट्रोफा, ही पिके घेतली तर आदिवासी भागाचे चित्रच बदलू शकते. परंपरागत पद्धतीने शेती करून फारसे काही हाती येत नाही. अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले तर शेतक-यांना निश्‍चितपणे लाभ मिळतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी गडकरी म्हणाले की, विदर्भात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे हाती घेतली. रस्त्याची कामे करीत असतानाच नदी नाल्याच्या खोलीकरणाची कामे आम्ही केली. त्यामुळे जलसंधारणाची कामे झाली. ब्रिज कम बंधार्यांना मंजुरी दिली आणि 170 ब्रिज कम बंधारे बांधले. यामुळे पाण्याचा चांगलाच साठा उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार या योजनेमुळेही जलसंधारणाच्या कामात जनजागृती झाली. या कामासाठी विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काम करण्यासाठी 6 हजार कोटी दिले. विदर्भात 50 टक्केपर्यंत सिंचनाची व्यवस्था झाली तरी आत्महत्या या थांबतील असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाशा पटेल आणि नरेंद्र बोंडे यांची देखील समयोचित भाषणे झालीत. यावेळी प्रसिद्धी माध्यमांना आवाहन करताना गडकरी म्हणाले की, सध्या राज्यात कुणाचे सरकार बनले याची सर्वांना चिंता आहे. कुणाचेही सरकार बनले तरी ते योग्यच काम करले. कुणीही जनतेच्या विरोधात काम करीत नसते. त्यामुळे पत्रकारांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावेल, त्यांच्या समस्यांची सोडवणूक होईल यावर अधिक फोकस करून बातम्या दिल्या पाहिजेत असे गडकरी यांनी सांगितले.