Breaking News

खाडीपात्रातील बेकायदा वाळूउपसा थांबेना

ठाणे
 खाडीपात्रातून होणारा बेकायदा वाळू उपसा थांबलेला नसून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी वारंवार केलेल्या कारवाईनंतरही वाळूमािमयांना कोणतीही जरब बसलेली नाही. पोलिसांनी नुकतीच भिवंडीतील भरोडी खाडीमध्ये कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु कारवाईच्या वेळी आरोपींनी खाडीमध्ये उड्या मारत धूम ठोकल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
भिवंडीतील भरोडी अलिमघर खाडीकिनारी जयेश, नितीन पाटील हे दोघे कामगारांकडून बेकायदा वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना िमळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खासगी होडीची व्यवस्था केली. शनिवारी रात्री होडीतून खाडीकिनारी पोलिसांचे पथक पोहोचले. त्यावेळी खाडीपात्रात चार ते पाच कर्मचारी दोन सक्शन पंप आणि दोन बाजच्या मदतीने वाळूउपसा करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कर्मचार्‍यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचार्‍यांनी पाण्यात उड्या घेत पलायन केले असून पोलिसांनी सक्शन पंप आणि बाज खासगी जप्त केले आहेत. बाजची किंमत 10 लाख 40 हजार आणि सक्शन पंप 8 लाख रुपये किंमतीचा आहे. एकूण मुद्देमालाची किंमत 18 लाख 40 हजार असून हे साहित्य आरोपी जयेश आणि नितीन पाटील यांचे असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. या कारवाईनंतर तहसिलदारांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश तलाठ्याला दिले. या आदेशानंतर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.