Breaking News

अवैध मुरुम उत्खनन करणारा पोकलॅन जप्त

पारनेर तहसीलदारांची कारवाई

पारनेर/प्रतिनिधी
वनकुटे येथे रस्त्याच्या कामात साईडपट्ट्यांवर टाकण्यात येणार्‍या मुरमाचे
अवैधरित्या उत्खनन करणारे पोकलॅन तहसीलच्या पथकाने ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. ही माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
वनकुटे ते तासदरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे.  डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याची साईटपट्टी भरण्याचे काम सध्या सुरू आहे. या साईट पट्ट्यांवर टाकण्यात येणारा मुरूम हा अवैधरित्या उत्खनन करुन आणण्यात येत होता.
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील सरकारी गट नंबर 87/1 या सरकारी मालकीच्या क्षेत्रातून कॉन्ट्रॅक्टर महेश गुंदेचा यांच्या मालकीचे पोकलेन व हायवा याच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू होती. ही माहिती शुक्रवारी दुपारी महसूल विभागाला मिळाली. दोनच्या सुमारास तहसीलदार ज्योती देवरे वनकुटे येथील अवैध उत्खनन सुरू असणार्‍या ठिकाणी पोचल्या. तहसीलदारांनी चौकशी केली असता कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्यांनी सांगितले की, आम्ही रॉयल्टी काढली आहे. सरपंचांनी आम्हाला या जागेतून मुरूम आणायला सांगितला आहे. मात्र तहसीलदारांनी हे उत्खनन सरकारी जागेत असल्याने व त्यासंदर्भात परवानगी घेतली नसल्याचे त्यांना म्हटले.
तहसीलदारांनी कारवाई करत तसेच पोकलेन मशीन ताब्यात घेतले.ते पारनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
परंतु कारवाईदरम्यान हायवा हे वाहन पळवून नेण्यात आले. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. कारवाई पथकात तहसीलदार देवरे, लक्ष्मण बेरड, के. टी. पवार, एम. आर. उंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी होते.


 सरकारी जागेतील गौण खनिजांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरपंचांची आहे. त्यांना सरकारी जागेतून मुरूम उत्खनन करण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही. यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या सरपंचांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच त्यांचे सरपंच पद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल.
 - ज्योती देवरे, तहसीलदार.