Breaking News

माका ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे धरणे सुरुच

चार दिवसांनंतरही फिरकेना अधिकारी; ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी

माका/प्रतिनिधी ः
ग्रामसेवकाच्या अरेरावीविरोधात माका ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी सुरु केलेले धरणे चौथ्या दिवसानंतरही सुरुच होते.
ग्रामपंचायतसमोर कर्मचार्‍यांनी धरणे धरले आहे. परंतु चार दिवसांनंतरही त्यांच्याकडे संबंधित खात्याचे अधिकारी फिरकलेले नाहीत.
        माका ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गर्जे हे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना अरेरावी करतात. त्यांनी शिवीगाळ करण्यासारखे प्रकारही केले आहेत. ग्रामपंचायतीची सदस्य कमिटीही या ग्रामसेवकाची बाजू घेते, असे धरणे धरलेल्या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे कामगारांचे म्हणणे आहे.
गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीची सदस्य कमिटी ग्रामसेवकाला पाठीशी घालत आहेत. ग्रामसेवक गर्जे हे माका गावात प्रभारी म्हणून काम करतात. कायमस्वरुपी ग्रामसेवक असतानाही ते दररोज माका गावात येतात. गटविकास अधिकारी यांनी त्यांना चार्ज सोडण्यास सांगितला आहे तरीही ते चार्ज सोडण्यास तयार नाहीत. उलट ते माका ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचार्‍यांना वाईट वागणूक देतात, अशा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारी आहेत. 
      माका ग्रामस्थ संबंधित ग्रामसेवकाचा निषेध करत आहेत. यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, भारतीय टायगर फोर्सचे गायकवाड, सेवा सहकारी सोसायटीचे खंडू लोंढे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सहदेव लोंढे, सरपंच घुले, उपसरपंच आशाबाई शिंदे यांनी ग्रामसेवकाची बदली न करता त्यांना निलंबित करावे, असा आग्रह धरला आहे. ते ही मागणी पंचायत समितीकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. आम्हा कामगारांना शिवीगाळ करुन, महिलांशीही ग्रामसेवक अरेरावीची भाषा करतात.
या ग्रामसेवकाची बदली न करता त्यांना कायमचे नोकरीवरुन काढून टाकावे. तसे न केल्यास आम्ही माका ग्रामपंचायतचे कामगार पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत.     
            - मल्हारी पांढरे, क्लार्क, माका ग्रामपंचायत.