Breaking News

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपची रणनीती : शेलार

मुंबई
शपथविधीनंतर भाजप आता बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष रणनिती आखण्यात येत आहे. त्यानुसार ऑपरेशन लोटसची मोहीम भाजपकडून रविवारी आखण्यात आली. त्यानुसार काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधून आलेले आमदार  गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर सोपवण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून विशेष रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी भाजपकडून रविवारी बैठक घेण्यात आली. येत्या 30 नोव्हेंबर रोजी विधानसभेत होणारा विश्‍वासदर्शक ठराव बहुमताने जिंकण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार बबनराव पाचपुते यांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आगामी विश्‍वासदर्शक ठराव संपूर्ण बहुमताने संमंत करेल, या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. असल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली. याचबरोबर भाजपा विधिमंडळ गटाचा एक अभिनंदनाचा प्रस्ताव देखील या बैठकीत संमंत करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व आमदारांनी संमंत केला. हे सरकार संपूर्ण पाच वर्षे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीला दिलेल्या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला असल्याचे मत सर्व आमदारांकडून मांडण्यात आले. तसेच ज्या विचारधारेच्या आधारावर युती टिकून होती, त्या विचाराला देखील शिवसेनेने तिलांजली दिली असल्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आला. 23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात विश्‍वासाचे वातारण निर्माण झाले आहे, असेही शेलार यावेळी म्हणाले. तसेच, भाजपाच्या आमदारांना कुठेही एकत्र ठेवण्याची गरज नाही. आमचा आमच्या आमदारांवर आणि नेत्यांवर विश्‍वास असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या पक्षांना आपल्या आमदारांवर विश्‍वास नाही, तेच आपल्या आमदारांना डांबून ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपसमोर विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्याचे मोठे आव्हान आहे.
कमळ फुलविण्याची जबाबदारी ‘या’ आमदारांवर
भाजपने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवले होते, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेले नेते गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर सोपवण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.


काँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू ः चव्हाण
सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले आहे, तिथे रुम बुक केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत असून अनेक प्रलोभन दाखवली जात आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या आमदारांना सुरक्षित स्थळी एका हॉटेलात ठेवले आहे. मात्र तिथेही राष्ट्रवादीचे आमदार पोहोचले असून त्यांनी या हॉटेलमध्ये रुम बुक करून आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे बहुमताचा आकडा आहे. तर भाजपकडे संख्याबळ नाही. त्यामुळे भाजपने काँग्रेस आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे चव्हाण म्हणाले.