Breaking News

चालू वर्षीचा गाळप हंगाम सर्वच साखर कारखान्यांना आव्हानात्मक : शिवाजी सावंत

सोलापूर
परतीच्या व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याला ऊस पीकही अपवाद नाही. त्याबरोबरच मागील दोन ते तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व अत्यल्प पाणी साठयामुळे ऊसाच्या लागवडी कमी प्रमाणात झाल्या आहेत. कार्यक्षेत्रातील उपलब्ध असणारा ऊस चारा छावण्यांना व लागवडीसाठी बहुतांश प्रमाणात तुटल्यामुळे घटलेले ऊसाचे क्षेत्र, कमी ऊस उत्पादन, आर्थिक मंदी, इंधनाचे वाढलेले दर आदी आव्हाने साखर कारखान्यासमोर उभी आहेत. त्यामुळे चालू वर्षीचा गाळप हंगाम सर्वच साखर कारखान्यांना आव्हानात्मक व कमी कालावधीचा असणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी केले.
भैरवनाथ शुगर युनिट-2 विहाळ (ता.करमाळा) या साखर कारखान्याचा सन 2019-20 या नववा गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे संचालक तथा धाराशिवचे जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत व त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती सावंत या उभयंताचे हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. चालू हंगामातील गाळपासाठी कारखाना अंतर्गत सर्व मशीनरींची दुरुस्ती, देखभाल व ओव्हरव्हॉलींगची कामे पूर्ण झालेली आहेत. कारखान्याकडे एकूण 7, 109 हे.आर इतकी ऊसाची नोंद झाली आहे. आजअखेर एकूण 286 ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर बैलगाडी व ऊसतोडणी यंत्रामागील ट्रॅक्टर आदी ऊसतोडणी वाहतुकीचे करार पूर्ण करुन कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. आजवर कारखाना अधिकारी व कर्मचार्‍यांबरोबरच कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस उत्पादक व सभासदांनी आमचे कारखान्यावर विश्‍वास ठेवून मागील सर्व गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून मदत केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचेशी असलेले नाते आणखी दृढ करण्यासाठी, विश्‍वासार्हता जपण्यासाठी कारखान्याचे संस्थापक आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी कारखान्याचे ऊस उत्पादक, सभासद यांच्याकरिता यंदाचा गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला.