Breaking News

मुळा'मधून जायकवाडीकडे होणारा विसर्ग बंद

राहुरी/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील मुळा धरणाकडे होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून जायकवाडीकडे होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. वांबोरी चारीच्या पाईपची दुरूस्ती अंतिंम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात पुन्हा चारी सुरू होणार आहे.

मुळा धरणातून जायकवाडीकडे यंदाच्या पावसाळयात ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी गेले आहे. मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग दीर्घकाळ सुरू राहिल्याने नदीकाठी असलेल्या शेतीला दिलासा मिळाला आहे. नदीपात्रात असलेले बंधा-यात पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून उसाचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी यंदा ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट  पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सुरू राहिल्याने आम्हाला पाणी नको, अशी मागणी पाटबंधारे खात्याकडे शेतक-यांना करावी लागली होती. त्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात आला होता. धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदाच्या पावसाळयात ९०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. दोन्ही कालव्याखाली असलेल्या क्षेत्रावर पावसाने सातत्य ठेवल्याने दोन्ही कालवे बंद करावे लागले होते.

भागडा चारीखाली असलेले तळे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. ५० क्युसेकेसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीची दुरूस्तीमुळे गेल्या तीन दिवसांपासून तळ््यासाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद आहे. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुळा धरणातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणातून १०२ बंधा-यापैकी ७० बंधारे पूर्ण क्षमतेकडे भरण्याचे काम सुरू होते. अन्य बंधा-यात पाणी जाण्यास तांत्रिक अडचणी असून जास्तीत जास्त क्षमतेने बंधारे भरण्याचे नियोजन सुरू आहे.