Breaking News

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ठाण्याची हवा श्‍वसनासाठी उत्तम

ठाणे
 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हवेचा कमालीचा खालावलेला दर्जा चिंताजनक ठरत असताना सध्या ठाणेकरांना मात्र शुद्ध हवेचा अनुभव येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेच्या गुणवत्तेनुसार केलेल्या क्रमवारीत ठाणे शहराची हवा देशात दुसर्‍या क्रमांकाची ठरली आहे. ठाण्याशेजारील कल्याण, डोंबिवली या शहरांतील नागरिकांना मात्र अजूनही प्रदूषित हवेत श्‍वास घ्यावा लागत आहे.
दिल्लीतील हवा प्रदुषणामूळे तेथील उद्योगधंदे, बांधकाम काही दिवसांसाठी बंद ठेवण्याची नामुष्की दिल्ली सरकारवर ओढावली आहे. तर तेथील शाळांनाही काही दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. असे असताना तलावांचे शहर अशी ओळख असणार्‍या ठाणे शहरातील हवेचा दर्जा हा श्‍वास घेण्यासाठी सर्वोत्तम असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रविवार, 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता देशातील 97 शहरांतील हवेच्या दर्जाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ठाण्यातील हवा दर्जा निर्देशांक 45 इतका असून देशातील दुसर्‍या क्रमांकांची शुद्ध हवा ठाणे शहरात असल्याचे समोर आले आहे. तर, केरळ राज्यातील ऐलोर या शहरातील हवा सर्वात स्वच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील हवा प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांची वाढणारी संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे शहरातील हवेत धूलिकणांची संख्या वाढली असून कल्याण डोंबिवली शहरात हवा निर्देशांक 109 इतका असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. हवेचा दर्जा सुधारला आहे. शहरातील ही आनंदाची बाब असली तरी त्याचे निकष पुन्हा तपासणे गरजेचे आहे. तसेच हवा शुद्ध राहावी यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे  पर्यावरण अभ्यासक सुरभी वालावलकर यांनी सांगितले.
चौकातील प्रदूषण मात्र कायम
ठाणे शहरात असणार्‍या मुख्य चौकातील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अहवालात समोर आले. त्यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये हवेच्या शुद्धीकरणासाठी यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, कित्येक महिन्यांपासून ही यंत्रणा बंदच असल्याचे निदर्शनास आले असून चौकातील प्रदूषण मात्र कायम असल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत महापालिकेतर्फे शहरात माठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात येत असून घनकचर्‍याचे व्यवस्थापनही योग्यरीत्या करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील धूलिकणांचे प्रमाण कमी झाले असून हवा स्वच्छ झाली आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका