Breaking News

सत्तास्थापनेचा तिढा कायम !

भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावे ; शरद पवार

मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 13 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, अजूनही कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्यामुळे, युतीचे सरकार सत्तेवर येण्यास मोठी आडकाठी निर्माण झाली आहे. शिवेसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यात नवीन समीकरण उदयास येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या शक्यता फेटाळून लावत विरोधी पक्षात बसण्याची तयारी दाखवली.
पत्रकार परिषदेत बोलतांना पवार म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांना जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करण्यासाठी पुढे यावे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करून, आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असेही पवार यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांनी 170 चा आकडा कुठून आणला ते माहित नाही. आज त्यांनी माझी जी भेट घेतली ती सहज भेट होती. त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळे समीकरण असण्याचा काही प्रश्‍नच निर्माण होत नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला महाराष्ट्रात बसायचे आहे कारण जनतेने सत्तेचा कौल युतीला दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे आणि हा पेच संपवावा असेही पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. 25 वर्षे युती सडली असे उद्धव ठाकरे म्हटले होते. त्याबाबत काय भाष्य कराल असा प्रश्‍न जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा 25  वर्षे सडले तरीही एकत्र लढले असे उत्तर दिले. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यावर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आलेले नाही. तसेच संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केले असते. तसे ते झालेले नाही, लोकांनी त्यांचा निर्णय दिला आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे काही समीकरण तयार झाले तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ इच्छिता का? असा प्रश्‍न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, मी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यात काहीही रस नाही हे सांगत असे कोणतेही समीकरण महाराष्ट्रात दिसणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.


संजय राऊत-शरद पवार यांच्यात खलबते
सत्तास्थापनेच्या दृष्टीने राज्यात वेगळे काय समीकरण अस्त्विात आणता येईल, यादृष्टीने शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. राऊत यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काही तासांचा अवधी उरल्यामुळे नवीन सत्तासमीकरण अस्तितात्वात येऊ शकते का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सत्तास्थापनेचा पेच सोडवावा असे शरद पवार म्हणाले असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार येणार : दलवाई

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे भाजपचे सरकार स्थापन होणार नसल्याचा दावा काँगे्रसचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी केला. दलवाई यांनी संजय राऊत यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना दलवाई म्हणाले की, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झालेला असतानाच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानेही काँग्रेस-शिवसेनेचे सूर जुळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.