Breaking News

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम !

राज्यपालांची अ‍ॅटर्नी जनरलशी चर्चा ; सत्तास्थापनेसाठी आजचा शेवटचा दिवस

मुंबई
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काही तासांचा अवधी उरला असतांनाही, युतीतील राजकीय नाटय संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्यामुळे, कोण सत्ता स्थापनेसाठी पुढे येतो, याचे उत्तर अजुनही अनुत्तरितच आहे. राज्यपालांनी राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले होते. अ‍ॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, उद्या संध्याकाळपर्यंत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी आपल्या आमदारांची बैठक मातोश्रीवर घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा. मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली असून उद्धव ठाकरे अद्यापही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. यामुळे भाजपा आणि शिवसेनेमधील तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरले होते ते व्हावे, बाकी काही अपेक्षा नाही असे सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सांगितले आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनच्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असेही ते म्हणाले. लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी आमदार फोडण्यासंबंधी विचारलं असता, कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. ही भाजी मंडई आहे का असं सांगत कोणीही आमचे आमदार फोडू शकत नाही असा विश्‍वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. आम्ही उद्दव ठाकरे यांना तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाल मान्य असेल असे सांगतिले आहे
दरम्यान, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे सांगितले आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत असून यासंबंधी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे म्हटले. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून शिवसेना-भाजपाचं स्थिर सरकार देणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबत आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आमच्याकडे भाजपशिवाय सत्तास्थापनेचा पर्याय : राऊत
भाजपशिवाय सत्तास्थापनेचा पर्याय आमच्याकडे तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपकडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. साम-दाम-दंड- भेद भाजप वापरतं आहे का? असे विचारताच ही नीती तर शिवसेनेची आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. साम-दाम-दंड भेद हा व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो, त्यामुळे अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचे देखील राऊत यांनी सांगितले.