Breaking News

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच ; त्याचा शपथविधी शिवतीर्थावर : संजय राऊत

Sanjay Raut
मुंबई
भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेसाठी उतावीळ झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी माध्यमांवर दिसत होत्या. भाजपने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम 5 नोव्हेंबरसाठी बुक केले असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी दादरमधल्या शिवतीर्थावर होईल.
संजय राऊत म्हणाले की, शिवतीर्थ बाळासाहेब ठाकरेंची आवडती जागा आहे. ही महाराष्ट्रासाठी क्रांतीकारक जागा आहे. तिथे महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथग्रहण सोहळा होईल.
शिवसेना कोणाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार? या प्रश्‍नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, सत्तेचं गणित जमलं की आम्ही ते माध्यमांसमोर मांडू. त्यासाठी चर्चा व्हाव्या लागतात आणि शिवसेना-भाजपमध्ये केवळ मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा होईल.
दरम्यान, फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी काही लोकांकडून गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला आहे. गुंडांची मदत घेऊन लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. राऊत म्हणाले की, याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्य वेळी मी ते सर्वांसमोर मांडणार आहे.