Breaking News

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे

eknath Khadase
मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर आपल्याला अनेक प्रतिक्रीया पाहायला मिळतात. अशातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ‘सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?’ असं एकनाथ खडसे विधीमंडळ परिसरात माध्यामांशी बोलताना म्हणाले. तसेच सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे होते, ते आअम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, कारण त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, असं खडसे म्हणाले आहेत.
‘2014 ला भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सामुहिक निर्णय घेतला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे त्या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय माझा वैयक्तिक नसून तो पक्षाचा होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने  जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते आपण सर्वांनी पाहिलंच. त्यानंतर ही चूक दुरूस्त करण्याचाही प्रयत्न झाला आणि सहा महिन्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली. त्यानंतर गेले साडेचार वर्ष युतीच्या माध्यमातून सरकार चालवलं. 2019मध्येही महायुतीला याठिकाणी मतदान करण्यात आलं असून जनतेनं स्पष्ट बहुमतही दिलं होतं. पण दुर्दैवानं मुख्यमंत्रीपद कोणाला? आणि किती वर्षांसाठी? या कारणामुळे भाजप आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ज्या घडामोडी झाल्या त्या आपण पाहिल्याच आहेत. स्पष्ट बहुमत असूनही महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही.’ असं एकनाथ खडे बोलताना म्हणाले.
‘माझं स्पष्ट मत आहे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी, आमच्यासारख्यांना घेऊन निवडणूक लढली असती, तर 25 जागा वाढल्या असत्या. पक्ष कधीच चूकत नाही. ज्यांच्या हातात धुरा दिलेली असते, त्यांचा निर्णय चुकू शकतो.’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी थेट भाजप नेतृत्त्वावर निशाणा साधला. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय? हा प्रश्‍न मी वरिष्ठांपासून सर्वांना वारंवार विचारला. माझी राजकारणातील 40 ते 42 वर्षांची तपश्‍चार्या आहे, माझा अधिकार होता. कठीण कालखंडामध्ये आम्ही पक्ष उभा केला आहे. त्यामुळे पक्षाचा विरोधात आम्ही जाऊ शकत नाही. या पक्षाच्या यशासाठीच आम्ही प्रयत्न केले असते. दुर्दैवाने ज्या लोकांनी या पक्षाच्या विकासासाठी मदत केली, अशा लोकांनाही बाजूला ठेवल्याचा या निवडणुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.’