Breaking News

इंद्रधनुष्य मोहिमेच्या पहिल्या टप्पा डिसेंबरमध्ये

 अहमदनगर/प्रतिनिधी

 जिल्ह्यात अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने इंद्रधनुष्य मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात २ डिसेंबरपासून मोहिमेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या मोहिमेचे नियोजन करण्यात येत असून यात  १ हजार ३९९ बालकांना लस देण्यात येणार आहे.

   मूल जन्मल्यापासून त्याला पाच वर्षांपर्यंत विविध प्रकारच्या रोगप्रतिकारक लसी दिल्या जातात. या लसी देण्यासाठी आरोग्य विभागाने वेळापत्रकही ठरवून दिले आहे. मुलांच्या पालकांनी लस देण्यासाठी मुलांना घेऊन दवाखान्यात आल्यानंतर लस दिली जाते. असे असले तरी स्थलांतरीत कामगार, ऊसतोडणी मजूर, विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी यांना त्यांच्या मुलांना लसीसाठी दवाखान्यात घेऊन येणे शक्य होत नाही. तसेच याबाबत त्यांना फारशी माहितीही नसते. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष होते. स्थलांतरीत कामगार रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरीत होत असल्याने मुलांचे नियमित लसीकरण करणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आल्याने इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत गावागावात सर्वेक्षण केले जात आहे. लसीकरण अर्ध्यावरच सोडलेल्या मुलांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे मोहिमेत या मुलांवर लक्ष केंद्रीत करण्यात येऊन त्यांना सर्व प्रकारच्या लसी देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३९९ अर्धवट लसीकरण केलेल्या बालकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोहिमेबाबत अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. नगर शहराचा यामध्ये समावेश नाही.

 केंद्र सरकारने २०२० पर्यंत ९० टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी २०१४ पासून इंद्रधनुष्य मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ही मोहीम २ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. चार टप्प्यात मोहीम राबवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा ६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारीपासून तिसरा टप्पा आणि २ मार्चपासून चौथा टप्पा सुरू होणार आहे. या मोहिमेत अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी सुरू आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच केंद्र स्तरावरील निरीक्षकांनीही आढावा घेतला आहे. जिल्ह्यात विविध इंद्रधनुष्य मोहीम सातत्याने राबवण्यात येत असल्याने जिल्ह्याचे पूर्ण लसीकरणाचे प्रमाण १८.५ टक्के वाढल्याचे दिसून आले आहे.