Breaking News

महाविकास आघाडी देणार देशाला नवी दिशा

पराभव झाला तर खचू नये आणि विजयाने माजू नये असा संदेश महाराष्ट्राच्या राजकारणाने अवघ्या देशातील राजकारण्यांना दिला आहे.पुरोगामी विचारांचा उदगाता असलेल्या महाराष्ट्रातून भारत वर्षाला परिवर्तनाची उर्जा दिली याचे अनेक दाखले इतिहासात आहेत.महाराष्ट्रात हीच परंपरा सांगणार्‍या सर्वधर्मसमभावाने कट्टर जातीयवादी विचार सरणीला दिलेला धडा आगामी राजकारणाची दिशा बदलण्यास निमित्त ठरला तर आश्‍चर्य वाटणार नाही.या परिवर्तनाचे शिल्पकार असलेले शरद पवार यांची पराभवाने न खचणारी मानसिकता आणि विजयाने हरकलेला भाजपेयी अहंकार यांच्यातील संघर्षाने निर्माण झालेले नवे समीकरण देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल.असे आश्‍वासक वातावरण तयार झाले आहे.अर्थात काही अपशकूनी शिवसेनेचा हिंदूत्व वाद आणि काँग्रेस राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्षता या सरकारच्या मुळावर येईल असा दरिद्री अंदाज बांधत आहेत.त्या नतद्रष्ट्रांसाठी प्रबोधन ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे अधिष्ठान हे धर्मनिरपेक्षच आहे हे समजून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.


शिवतिर्थावर संपन्न झालेल्या महाशपथ सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात चैतन्याची एक नवी लहर निर्माण झाली आहे.2014 च्या दरम्यान देशभर निर्माण झालेल्या मोदी लाटेपेक्षाही ही लाट मोठी आहे.डांगोरा पिटण्याची सवय असल्यामुळे मोदी लाट दिसत होती.ही लाट सुप्त असल्यामुळे दिसत नाही हाच काय तो दोन्ही लाटेतील फरक.ही लाट निर्माण होण्यास शरद पवार यांचा राजकीय जाणतेपणा जेव्हढा कारणीभूत आहे तेव्हढाच भारतीय जनता पक्षाच्या गोटात सत्तेतून निर्माण झालेला अहंकार कारणीभूत आहे.हेच महाराष्ट्राच्या राजकारणातून स्पष्ट झाले आहे,सत्ता मिळाल्यानंतर भाजपेयींची देहबोली अचानक बदलली.आपण लोकशाहीचे सेवक आहोत ही भावना दुरदुरपर्यंत त्यांच्या देहबोलीतून पाझरत नव्हती.पाच वर्षापुर्वी शपथ घेतल्याच्या क्षणापासून या मंडळींचं वागण बोलणं एखाद्या हुकूमशहापेक्षा वेगळ नव्हतं आणि नाही.देशाच्या कानाकोपर्‍यात ही बाब लपून राहीली नाही. सत्ता हातात आहे म्हणून आपण काहीही करू शकतो.घटनेची तमा न बाळगता आपल्याला हव तेच करायचा सपाटा या सरकारने लावल्याचे 2014 नंतर वारंवार दिसले.महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराला भाजपाची हीच अहंकारी देहबोली निमित्त ठरली.
गेल्या पाच वर्षात मुख्यमंञी म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांनी   सरकार आणि पक्ष पातळीवर दाखवलेली एकाधिकारशाही राज्य भाजपाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली हे नाकारता येणार नाही.फडणवीसांच्या आतला मी मुख्यमंञीपदावर आरूढ झाल्यानंतर झपाट्याने बाहेर आला.या मी ने भाजपातील त्यांचे प्रतिस्पर्धी एकएक करून बाजूला सारले.दिल्लीचाच कित्ता गिरवत देवेंद्रांनी भाजपाच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान असलेल्या अनेक जेष्ठांना राज्याच्या राजकारणातून बाजूला केले.एकनाथ खडसे,विनोद तावडे,चंद्रकांत बावनकुळे अशा काही मंडळींना निवडणूकीतून दुर  तर ठेवलेच.शिवाय पंकजा मुंडेंसह आणखी काही आमदारांच्या पराभवात त्यांनी सुञधाराचे काम केले असा आरोप त्यांच्यावर होतो आहे.स्वपक्षातील महत्वाकांक्षी प्रतिस्पर्ध्यांना टिपल्यानंतर मिञपक्ष असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी काञजचा घाट दाखविण्याचा प्लन केला होता.तो अंमलात आणण्याचाही आटोकाट प्रयत्न केला.निकालानंतरच्या पहिल्या पञकार परिषदेत सरकार महायुतीचच...सरकार महायुतीचच..असे ठामपणे सांगीतले त्यावेळी त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत असलेला सत्तेचा अहंकार शब्दागणिक व्यक्त झाल्याचे महाराष्ट्राने पाहीले.त्यानंतर काय काय नाट्य घडले ,सत्तेचा दुरूपयोग कसा केला गेला हेही आपण सारे जाणतोच.या ठिकाणी एक प्रश्‍न सातत्याने विचारला जातोय तो म्हणजे एव्हढे सारे घडत असताना दिल्लीचे भाजप नेतृत्व तटस्थ का राहीले? फडणवीसांच्या मदतीसाठी मैदानात का उतरले नाही.गोवा कर्नाटक सारख्या राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी अमित शहांनी जे स्वारस्य दाखविले तेव्हढा सहभाग महाराष्ट्रात का दिला नाही? या प्रश्‍नाचे उत्तर पुन्हा फडणवीसांची अहंकारी महत्वाकांक्षा हेच आहे.भविष्यातील धोका ओळखून अमित शहांनी फडणवीसांचे पंख छाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि म्हणूनच महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पुन्हा सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ तीन दिवसात कोसळलं. तीन दिवसात सरकार कोसळल्याने भाजपची नाचक्की झाली. त्यामुळे मुंबईच्या वारामुळे दिल्ली घायाळ झाली.त्याचे दूरगामी परिणाम दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणावर होणार हे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य भाजपच्या हातून निसटल्याने भाजपच्या नेत्यांची झोप उडाली असणार.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचे त्यांच्या पक्षातून बंड करणे हे काही नवीन नाही. असे असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अजित पवार यांच्यावर ठेवलेला विश्‍वास कशाच्या जोरावर ठेवला याचे कोडं पडलंय. सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याचा मोह फडणवीस यांना आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी मिळेल ते खिशात घालण्याची तयारी केली
भाजपने राज्यात सत्ता तर गमावलीच त्याखेरीज नागरिकांची सहानभूतीही गमावली. सत्ता स्थापनेच्या चर्चेत शिवसेनेने हट्टीपणा करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी भाजपला थोडी सहानुभूती होती. मात्र, अजित पवारांसोबत जाऊन गोळाबेरीज करण्याच्या नादात भाजपने स्वत:चे नुकसान करुन घेतले. जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांना सरळ सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला असता तर कदाचित नागरिकांची सहानुभूती भाजपला मिळाली असती. मात्र, आता ती पुन्हा मिळवणे अवघड आहे. भाजपने सत्तेच्या लोभापायी चार दिवसात आपलीच माती करून घेतली.
या नाट्यानंतर शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा भिन्न विचारसरणीच्या पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे.भिन्न विचारसरणीमुळे हे सारकार अल्पावधीत कोसळेल असा अपशकून पराभूत मानसिकतेच्या भाजपाकडून सरकारच्या अस्तित्वात येण्यापुर्वीच केला गेला.एखादी नवीन गोष्ट घडत असताना शुभेच्छा देण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे.माञ सतत नकारात्मक विचार पोसणार्‍या भाजपाने इथेही पायंडा मोडला.माञ हा अपशकून करताना भाजपाची पराभूत मानसिकता एक बाब विसरली आहे.या तिन्ही पक्षांना सत्ता नावाचा बिंदू एकञ ठेवणार आहे.शिवाय धर्मनिरपेक्षमुल्यांचे अधिष्ठान असलेल्या दोन्ही काँग्रेससोबत आलेल्या शिवसेनेचेही मुळ अधिष्ठानही धर्मनिरपेक्षकता,सर्वधर्मसमभाव आहे.राजश्री शाहु महाराजांच्या विचारांचा पगडा शिवसेनेच्या जन्मापासून आहे हे भाजपाला विसरता येणार नाही.छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार महाविकास आघाडीला एकत्र ठेवतील.सावरकरांचा हिंदुत्वाची मुळ प्रेरणा मुसोलिनीच्या फॅसिझम मध्ये आणि हिटलरच्या नाझीजम  मध्ये आहे आणि अशा विचारसरणीचा आदर करणारे केंद्र सरकार जेव्हा घटनेची हवी तशी मोडतोड करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते लोकशाहीला धोकादायक बनलेले असते. राज्यपाल कोशारी हे ज्या शक्तीच्या हातचे कठपुतली बाहुली आहेत ती शक्ती कोण आहे हे सांगण्याची गरज नाही .ज्यांचा लोकशाहीवरचा विश्‍वास नाही असे ते लोक आहेत. पराभूत भाजपचे आमदार महाराष्ट्रामध्ये वारंवार शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून देतात त्यांना याची कल्पना नाही की शिवसेनेची स्थापना ज्या प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या विचारावर आधारित झाली .ते ठाकरे छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकीर्दीत काम करीत होते .छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा हेच प्रबोधनकार ठाकरेंचे संस्कार शिवसेनेवर आहेत .काही काळ ढेकणाचा सहवास लाभल्यामुळे हिरा भंगला अशी अवस्था शिवसेनेची झाली होती. आता पुन्हा त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा, छत्रपती शाहूंच्या पुरोगामी सामाजिक क्रांतीच्या विचारांचा वारसा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष किंवा काँग्रेस पक्ष यांच्या मूलभूत विचारसरणीमध्ये काहीही फरक नाही उलट ही सारी पुरोगामी महाराष्ट्राला सामर्थ्यशील बनवणारी विचारसरणी आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाही मुसलमानाचा द्वेष केलेला नाही त्यांच्या राज्यामध्ये अनेक सेनापती मुस्लिम होते ,यांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे त्यांचे रयतेचे राज्य होते .आज हाच अजेंडा शिवसेना राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा असल्यामुळे वैचारिक रित्या त्यांची बैठक एकच आहे. त्यात फूट पाडायचा प्रयत्न करणारे अपयशी ठरतील कारण त्यांना देशाला धर्मांधतेकडे न्यायचे आहे आणि त्यापासून आम जनतेने सावध राहायला हवे. अपयश पचवायला ही मोठेपण लागतं ते राष्ट्रीय सेवक संघाच्या अनैतिक धार्मिक कृत्यावर पोसलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे नाही हेच खरे. निदान भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचे सोडून समर्थ रामदास, परशुराम, गोळवलकर गुरुजी यांच्या नावाचा जप करावा हे अधिक प्रामाणिक ठरेल.