Breaking News

वेतन निश्‍चितीसाठी तालुकानिहाय शिबिरे घ्या

अहमदनगर/प्रतिनिधी 
’’मुल्यांकनास पात्र घोषित 20 टक्के अनुदानावरील मान्यता प्राप्त शाळा व महाविद्यालयातील विना अनुदानित तत्वावरील तसेच सातवा वेतन आयोग घेणार्‍या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतन निश्‍चितीसाठी जिल्हा वेतन लेखाधिकारी कार्यालयाने तालुकानिहाय शिबिरे घ्यावीत, अशी मागणी जिल्हा शिक्षक भारती संघटनेने वेतन लेखाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय 13 सप्टेंबर 2019 अन्वये उच्च माध्यमिक शाळांमध्ये ज्या तुकड्या अनुदानास पात्र घोषित करण्यात आल्या आहेत त्या तुकड्यांवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 एप्रिल 2019 पासून सरसकट 20 टक्के अनुदान देण्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती होणार आहे. तसेच अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक मार्च 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत. अशा शाळांवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचीही वेतन निश्‍चिती झालेली नाही. त्यांच्याही वेतन निश्‍चिती वेतन लेखाधिकारी कार्यालयाने तालुकानिहाय शिबीरे घेऊन वेतन निश्‍चिती करावी, सध्या हे काम नगर येथील वेतन लेखाधिकारी कार्यालयात सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्याभरातून शाळांना वेतन निश्‍चितचे प्रस्ताव नगरला पाठवावे लागतात. त्यात शाळांची गैरसोय होते.
यासाठी शिक्षक नेते सुनील गाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,  विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, श्रीकांत गाडगे, काशिनाथ मते, सुनील गायकवाड, रावसाहेब कासार, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, डॉ.किशोर डोंगरे, महेश पाडेकर, कैलास राहणे, रोहिदास चव्हाण, आशा मगर, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळूंज, जया गागरे, छाया लष्करे, संध्या गावडे आदींनी निवेदन दिले.