Breaking News

आता पोरखेळ थांबवण्याची गरज

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून पंधरवडा उलटला आहे  किमान आता तरी  कोंडी फुटेल आणि काही मार्ग निघेल, अशी शक्यता वाटत होती. परंतु शरद पवार आणि संजय राऊत यांची  भेट झाल्यानंतर, पवार यांची बहुचर्चित पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी हजेरी लावल्यानंतरही विषय पुढे ढकलला जात नाही. नवे  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांतून जी गरळ एकमेकांविरूध्द बाहेर पडली ती पाहता या दोन्ही पक्षांना यापुढे अतुट  मैत्री असल्याचा  आभास निर्माण करत आपला संसार सुरू ठेवता येणार नाही  किंवा तीस वर्षे एकत्र नांदणार्‍या दोन्ही पक्षांनी अहंकार सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यातच त्यांचे भले आहे. कारण राज्यासमोरचे प्रश्‍न गंभीर आहेत  ते तातडीने सोडवण्यासाठी सरकार स्थापनेची गरज आहे, जनतेने जनादेश युतीला दिला आहे,त्यात लवकर निर्णय घेता न आल्यास जनतेसमोर पुन्हा जाताना नाक रहाणार नाही तसे जमत नसल्यास अन्यथा अशा  परिस्थितीत आधी या दोन पक्षांनी काडीमोड घ्यावा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि फेरनिवडणुका घ्याव्यात. हे दोन पक्ष एकत्र येणार नसतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आणण्याचा प्रयत्न करावा. सरकार बनवण्यात दवडण्यात येत असलेली वेळ लोकशाहीची चेष्टा असेल. ती टाळण्यासाठी हा पोरखेळ थांबवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून पंधरवडा उलटला आहे. किमान आता तरी  कोंडी फुटेल आणि काही मार्ग निघेल, अशी शक्यता वाटत होती. परंतु शरद पवार आणि संजय राऊत यांची  भेट झाल्यानंतर, पवार यांची बहुचर्चित पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी हजेरी लावल्यानंतरही विषय तिथल्या तिथेच आहे. क ाळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांतून जी गरळ एकमेकांविरूध्द बाहेर पडली ती पाहता या दोन्ही पक्षांना यापुढे त्यातून सुगंध येत  असल्याचा आभास निर्माण करत आपला संसार सुरू ठेवता येणार नाही. तसा त्यांनी प्रयत्न केलाच तर तो राजकीय व्यभिचारच असेल. खरे तर इतकी वर्षे तो तसाच सुरू होता. संसाराच्या या रहाटगाडग्यात  एक मेकांच्या उणिवा झाकत दोन्हीही मनमग्न राहिले आणि जनतेची दिशाभूल करीत राहिले. पण हा खोटेपणा फार काळ टिकणार नव्हता व व्हायचे तेच झाले. फडणवीस आणि ठाकरे यांच्या पत्रकार परिषदांतून जी एक मेकांची वेशीला टांगता येईल तेवढी प्रसार माध्यमातून अब्रू टांगली. इतकी अब्रूची लक्तरे बाहेर आल्यावर हा जोर-जबरदस्तीचा संसार संपवावा. ती वेळ आता समोर येऊन ठेपली आहे. हे दोन्ही पक्ष आता आणखी  एकत्रितपणे नांदू शकत नाहीत. एकत्रित नांदले तर महाराष्ट्राशी व जनतेशी  प्रतारणा ठरेल. त्यासाठी ठाकरे यांनी भाजप सरकारातून बाहेर पडावे. इतके वाईट बोलायचे आणि केंद्रात एक भुक्कड मंत्रिपद कवटाळून  बसायचे, हे त्यांच्यासारख्या मर्द महाराष्ट्राची परंपरा सांगणार्‍यांना शोभणारे नाही.
लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी निवेदन  करताना, विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये पद आणि जबाबदार्‍यांचे समान वाटप केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तेव्हा शिवसेनेची गरज होती म्हणून दिलेले ते आश्‍वासन होते आणि  विधानसभेच्या वेळी तशी काही परिस्थिती येणार नाही, अशी भाजपच्या सर्व नेत्यांची धारणा होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी झंजावाती प्रचार करून  सत्ताधार्‍यांचा खेळच बिघडवून टाकला.  त्या अर्थाने पाहिले तर पाच वर्षांपूर्वी केलेली चूक पवार यांनी दुरुस्त केली, असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादीने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्यामुळे पाच वर्षांपूर्वी शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते आणि आता पवार  यांच्या भूमिकेमुळेच शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यातून ताणलेला सत्ता-संघर्ष नेमका कोणत्या वळणावर जाणार आहे, याचा अंदाज आजही न यावा, यावरूनच या सत्ता-संघर्षातील एकूण अनिश्‍चिततेची कल्पना  येऊ शकते. पत्रकार परिषदेत पवार काही संकेत देतील असा अंदाज होता. परंतु इथे पुन्हा पवार तेल लावलेल्या पैलवानासारखे निसटले. कौल युतीला आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे, असे सांगून काँग्रेस-राष्ट ्रवादीला विरोधात बसण्यासाठी कौल दिला असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. अशा या सगळ्या धुसर वातावरणात राज्यातील जनतेसमोर एकच प्रश्‍न आहे की, सत्ता-संघर्षाचा हा पोरखेळ कधी थांबणार? तीस  वर्षांहून अधिक काळ सोबत असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी यापूर्वी अनेकदा परस्परांवर तलवारी उपसल्या आहेत व त्या म्यानही केल्या आहेत.
2014 च्या लोकसभेतील यशानंतर भाजपने आयत्या वेळी युती तोडून शिवसेनेला एकटे पाडले होते. त्यानंतर दोन्ही पक्ष सोबत चालत राहिले. त्यातही पुन्हा गेल्या पाच वर्षांत अनेकदा भाजपने येऊ नका म्हटले  तरी, उद्धव ठाकरे यांनी भाजपची शेपटी सोडली नाही. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी असे नमूद केले की शिवसेना युतीत सडली तरी त्यांनी सत्ता सोडण्याची धमक दाखवली नाही. आताही संजय राऊत  यांनी संघर्ष टिपेला नेला असला तरी उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी माघार घेऊन मिळेल त्यावर तडजोड करतील, यावर अनेकांचा भरवसाच नाही. या अवसान गिळण्याच्या उध्दवच्या प्रवृत्तीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसही  सावध पावले टाकत आहे.
काँग्रेसने मात्र एकच धोरण अवलंबले आहे काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचीही शिवसेनेला समर्थन देण्यासंदर्भात अनुकूलता असली तरी या एकूण घडामोडींशी आपला संबंध नसल्याचे भासवत आहेत. अशा प रिस्थितीत भाजप-शिवसेनेमधील कटुता कमी होऊन संवाद सुरू व्हावा आणि कोंडी फुटावी, अशीच बहुतेकांची अपेक्षा आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यशस्वी तडजोड क रतील अशी त्यांची अपेक्षा आहे. पण पद आणि जबाबदार्‍यांचे समान वाटप करण्यासंदर्भात दिलेल्या शब्दाचे काय? भाजप तो शब्द पाळण्याचा का किंवा शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडणार का? यावर पुढचे  सगळे अवलंबून आहे.  तीस वर्षे एकत्र नांदणार्‍या दोन्ही पक्षांनी अहंकार सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यातच त्यांचे भले आहे. कारण राज्यासमोरचे प्रश्‍न गंभीर आहेत ते तातडीने सोडवण्यासाठी सरकार स्थापनेची  गरज आहे, जनतेने जनादेश युतीला दिला आहे, त्यात लवकर निर्णय घेता न आल्यास जनतेसमोर पुन्हा जाताना नाक रहाणार नाही. जमत नसल्यास अन्यथा अशा परिस्थितीत आधी या दोन पक्षांनी काडीमोड  घ्यावा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि फेरनिवडणुका घ्याव्यात. हे दोन पक्ष एकत्र येणार नसतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आणण्याचा प्रयत्न करावा. सरकार  बनवण्यात दवडण्यात येत असलेली वेळ लोकशाहीची चेष्टा असेल. ती टाळण्यासाठी हा पोरखेळ थांबवण्याची गरज आहे.