Breaking News

माथेरानचा आगामी काळात परिपूर्ण कायापालट

Matheran
माथेरान
 जनतेने विश्‍वास दाखवून आमच्या हाती 2016 मध्ये एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळेच आम्ही अल्पावधीतच बहुतांश सकारात्मक कामांना न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे.नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमचे नगरपरिषदेतील सर्व सदस्य एकदिलाने कामात पुढाकार घेत आहेत.प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या नित्याच्या असणार्‍या अडचणी पूर्णत्वास जात आहेत. गल्लीबोळात विजेचे पोल, तसेच मातीची धूप होऊ नये यासाठी पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे केली जात आहेत. आवश्यक भागात उघडया जागेवर छोटी छोटी उद्याने बनवून जागांचा सदुपयोग केला आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणी स्वच्छता राखली जात आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी जुन्या अस्वच्छ कचरा कुंड्या, स्टॅण्ड पोस्ट काढून त्या जागांचे सुशोभीकरण केले जात आहे.
सुरुवातीला काही शासकीय अधिकार्‍यांच्या कामचुकारपणामुळे कामे पूर्ण होण्यासाठी उशीर झाला होता. परंतु मागील वर्षी कार्यशील मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या रूपाने नगरपरिषदेला लाभले. यातूनच आम्हाला कामे करण्यासाठी ऊर्जा मिळाली त्यानुसार आम्ही विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करू शकलेलो आहोत. अशी नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत यांनी माहिती दिली.
अल्पावधीतच आमच्याकडे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच असल्याने आम्हाला सुद्धा तितक्याच ताकदीने कामे करण्यासाठी बळ मिळत आहे. इथल्या कामांची रूपरेषा काय पद्धतीची असायला हवी हे सुज्ञ नागरिकांना ज्ञात आहेच त्याप्रमाणे आम्ही सचोटीने कामे करीत आहोत.
कुठल्याही सकारात्मक कामासाठी पुढाकार घेतला, गावाच्या हितासाठी विकासात्मक निर्णय घेऊन कामे करण्यास सुरुवात केल्यावर पुढील काळात आपल्याला काही कामे करण्यासाठी शिल्लक राहतील की नाही या भीतीने अनेकांचे पोटसुळ आपोआपच उठलेले असते. आपण जर विरोधकांकडे लक्ष केंद्रित केले तर गावाचा विकास होण्यास उशीर होणार ही कल्पना आम्हाला असल्याने यातूनच होणार्‍या कामांना विरोध होत गेल्याने कामे पूर्ण होण्यास उशीर केला जात आहे.त्यातूनही आम्ही विरोध होत असताना त्यांना न जुमानता केवळ गावाच्या विकासासाठी कामे पूर्ण करण्यासाठी झटत आहोत. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी नगरपरिषद सभागृहात पदे उपभोगली आहेत त्यांना ठाऊक आहे की शासनाचा निधी उपलब्ध करतानाकिती त्रासदायक आणि जिकिरीचे असते तरीसुद्धा नाहक विकास कामांना आड येऊन खोडा घातला जात आहे.
आमची जरी ही नव्याने सुरुवात असली तरीसुद्धा जुन्या जाणत्या राजकारण्यांना आम्ही सत्ता प्रस्थापित केल्यापासून एकप्रकारे दहशत निर्माण झाली आहे. अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे आणि सुज्ञ जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखवल्या मुळेच आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी पात्र ठरलो आहोत. सत्तेच्या या सारिपाटात अजून बरेच नवनवीन बदल आणि घडामोडी अपेक्षित आहेत. एकूणच केवळ बावन्न किलोमीटर परिसर असलेल्या या छोट्याशा गावाचा आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. अद्याप खूपच विकासात्मक कामे आमच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत. त्यामुळेच आगामी काळात नक्कीच माथेरान शहराचा कायापालट करून सुशिक्षित बेरोजगार युवकांना हमखास रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.असेही प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.