Breaking News

आम्हाला बाजूला ठेवल्यामुळे फडणवीस पायउतार : एकनाथ खडसे

Eknath Khadase
मुंबई
राज्यात भाजपचे सरकार कोसळण्यासाठी भाजपच जबाबदार असून, जर माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला भाजपने सोबत घेतले असते, तर आज भाजप सत्तेत असता. मात्र त्यासाठी आम्ही पक्षाला दोष देणार नाही. पक्ष कधीही चुकत नसतो. पक्षासाठी निर्णय घेणारे नेते चुका करतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षांवर तब्बल एका महिन्यानंतर पडदा पडला. यात भाजपची पुरती नाचक्की झाल्याचे दिसून आले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अचानक फिरलेल्या या राजकारणावर भाष्य करताना खडसे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला. ’अनेक वर्षे मी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. दगड धोंडे, शेणाचा मारा सहन केला. मात्र, मला हेतूपरस्पर बाजूला ठेवले गेले. भाजपने मला तिकीट दिले गेले नाही. तो निर्णय आम्ही मान्य केला. मात्र, पक्षाच्या प्रचारातही आम्हाला स्थान दिले गेले नाही. ती जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली असती तर भाजपचे किमान 20 ते 25 आमदार जास्त निवडून आले असते. मात्र, पक्ष वाढवणार्‍यांनाचा बाजूला ठेवले गेले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसते,’ अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे भाजपकडे असल्याचे यापूर्वी बोलले जात होते. त्याबद्दल विचारले असता खडसे म्हणाले, राज्यातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत. तेव्हा रद्दीचा भावही जास्त होता. 2014 मध्ये एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय माझा नव्हता तर दिल्लीतून आला होता. विरोधीपक्ष नेता म्हणून ते जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सहा महिन्यांनी चूक दुरुस्त करत सेना-भाजप सरकारमध्ये एकत्र आले. पण त्यानंतर एक वेगळेच चित्र निर्माण करण्यात आले. दुर्दैवाने मुख्यमंत्रिपदावरुन एकमत न झाल्याने यावेळी शिवेसेना भाजपा वेगळे झाले, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. माझे वैयक्तिक मत आहे की, भाजपाने अजित पवार यांचा पाठिंबा नको घ्यायला हवा होता. एका मोठ्या सिंचन घोटाळ्यात ते आरोपी आहेत, तसेच त्यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यामुळे त्यांच्याशी युती करायला नको होती, असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले
सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकण्यात आले असल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मला सोबत घेतले असते, तर आज राज्यातील चित्र वेगळे असते. फडणवीस यांनी मला व विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना सोबत घेतले असते, तर भाजपच्या किमान 25 जागा वाढल्या असत्या असा दावा खडसे यांनी केला. पक्षाचा विस्तार करण्यासाठी झटलेल्या माझ्यासारख्या नेत्याला हेतूपुरस्पर बाजूला ठेवण्याचे कारण काय?, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.