Breaking News

सत्तास्थापनेचे दिग्दर्शक ठरणार शरद पवार

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आता काही वेळ शिल्लक आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या अटीमुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा अद्याप केला नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती केवळ शरद पवारांमुळे असल्याची चर्चा असून महाराष्ट्रातील राजकारणाची स्क्रिप्ट अजुनही पवारांच्याच दिग्दर्शनाखाली सुरू असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे सोबत निवडणूक लढणारे भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी शक्यता होती. मात्र शिवसेनेने घेतलेल्या 50-50 च्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. त्याच बळावर भाजपने शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला केवळ चार मंत्रीपदं आली होती. आता राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरित्या आपला कल शिवसेनेच्या बाजुने दाखवला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण एक वळणावर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून दूर राहतो की का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे निर्णय शरद पवारांवरच सोपविले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत कित्येक दिवसांपासून पवारांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींची संपूर्ण स्क्रिप्ट अजुनही पवारांच्या डारेक्शनखालीच पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे.