Breaking News

काटवन खंडोबा ते स्वीट कॉर्नर रस्त्यास निधी द्यावा

अहमदनगर/प्रतिनिधी
“प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा कमान ते स्वीट कॉर्नर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाले आहे. पावसामुळे या रस्त्याच्या खड्ड्यात पाणी साचते, त्यामुळे या रस्त्याचा वापर नागरिकांना करता येत नाही. त्यामुळे काटवन खंडोबा ते स्वीट कॉर्नर रस्त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा’’, असे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले.
याबाबत मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेविका जाधव बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा रस्ता महापालिकेला वारंवार विनंती करुनही दुरुस्त केलेला नाही वा मुरुमही टाकलेला नाही. याबाबत महानगरपालिकेला वारंवार विनंती करुन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहारही केलेला आहे तसेच महानगरपालिकेच्या महासभेत वारंवार या रस्त्याच्या संदर्भात प्रश्‍नही उपस्थित करुन सुद्धा या प्रश्‍नावर महासभेने कोणताही निर्णय अद्यापपर्यंत घेतलेला नाही. तसेच एकाही पत्रावर महापालिकेने कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. काटवन खंडोबा रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यास प्रभागातील नागरिकांच्या समवेत तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन करण्यात येईल व त्याच्या होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील’’, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी दत्ता जाधव, बाळासाहेब ससे, दिनेश दळवी, बाळासाहेब डागवाले, विशाल लोळगे, विकी हिरणवाळे, गणेश वाघमारे, शाबीर शेख, दत्ता शेळके, गणपत गवळी, जाकीर शेख, अक्षय गोंधळे, विशाल गायकवाड, वैजीनाथ लोखंडे आदी उपस्थित होते.