Breaking News

अखेर धोनीने मौन सोडले जानेवारीपर्यंत विचारु नका!

dhoni
मुंबई
धोनीच्या मनात चाललेय तरी काय, हा प्रश्‍न अवघ्या क्रिकेट वर्तुळाला यंदाच्या जुलैपासून सतावत होता. अखेर त्याचे उत्तर बुधवारी मुंबईत मिळाले, ज्यावेळी धोनी येथे एका खासगी कार्यक्रमात आला होता. धोनी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पुढे आला आणि त्याने चारच शब्दात स्पष्टपणे सांगून टाकले. जनवरी तक मत पुछो!
महेंद्रसिंग धोनीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. जुलैमध्ये आयसीसी वनडे विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, मंगळवारी त्याच्या एका निकटवर्तियाने धोनी पुढील आयपीएल स्पर्धेनंतर आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी निर्णय घेईल, असे जाहीर केले होते. पण, यानंतर 24 तासाच्या आतच स्वत: धोनी पुढे आला आणि त्याने जानेवारीपर्यंत आपल्याला काहीही विचारु नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
जुलैनंतर धोनीचा विंडीज दौऱयात समावेश नव्हता आणि याचबरोबर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकांमध्येही तो खेळला नव्हता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाचे नेतृत्व भूषवणारा 38 वर्षीय धोनी दि. 6 डिसेंबरपासून विंडीजविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 3 टी-20 व 3 वनडे सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतही खेळणार नसल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर निवड समिती ऋषभ पंतसारख्या युवा खेळाडूंना पसंती देईल, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले होते. पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी धोनीला पाठबळ दर्शवल्याने थोडेसे वेगळे चित्र दिसून आले. आता प्रत्यक्ष धोनीने जानेवारीपर्यंत काहीही विचारु नका, असे स्पष्ट केले असल्याने आणखी दीड-दोन महिने तो सक्रिय नसेल, असेच संकेत आहेत.