Breaking News

वृक्षतोडप्रकरणी 14 मालट्रकवर कारवाई


पारनेर/ प्रतिनिधी ः
झाडांची बेकायदा कत्तल करुन वाहतूक करणार्‍या 14 मालट्रकवर वनविभागाने कारवाई केली. गुरुवारी रात्री नगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ढोकी टोलनाक्यावर ही कारवाई करण्यात आली.
या मालट्रकमधील तोडलेली लाकडे भिवंडी व मुंबई या ठिकाणी विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती वाहन चालकांनी दिली. नाशिक विभागीय वनअधिकारी दक्षता पथक, फिरते पथक (अहमदनगर) व टाकळी ढोकेश्‍वर वनविभाग यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. वनविभागाने ही सर्व वाहने वडगाव सावताळ येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये उभी केली आहेत.
  नाशिक दक्षता विभागीय वन अधिकारी स्वप्नील घुर्रे, उपवनसंक्षक आदर्श रेड्डी, राहुरीचे सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखुळे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल साहेबराव भालेकर, वनपाल मारूती मोरे, वनरक्षक नितीन गायकवाड, वनरक्षक विजय थोरात, वनरक्षक नानाभाऊ गायकवाड, वनरक्षक अरविंद सूर्यवंशी, वनरक्षक मायकेल गाढवे, वनरक्षक अमोल गोसावी, वनरक्षक नाना जाधव, वनरक्षक फारूख शेख, चालक दीपक रोकडे यांचा पथकामध्ये सामावेश होता.
या वनविभागाच्या कारवाईत 14 वाहने ताब्यात घेण्यात आली. मालट्रकवरील चालक - सलीम सुभेदार शेख, इकबाल शेख लाल, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, शकील करीम कुरेशी,  नासिर बन्वेखा पठाण, इरफान सय्यद इब्राहीम (सर्व राहणार अहमदनगर). संभाजी बाजीराव मोहिते, प्रशांत हरिभाऊ लेकुरवाळे (राहणार जामखेड), शेख इब्रान अफसर, नवनाथ वंचराम साळुंके, शेख इब्राहीम शेख मन्सूर (राहणाार बीड), मोहन बाबुराव मांडगे (राहणार टाकळीभान, श्रीरामपूर), शकीर झाकीर काझी (राहणार धोंडराई, जि. बीड), अख्तर पथरू शेख (राहणार शेवगाव) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. या सर्व जणांना नगर येथील उपवनसंक्षक यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.

दुर्लक्ष का झाले...
वनविभागाच्या कारवाईमुळे वृक्षांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. याकडे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून वृक्षलागवड योजना राबवायच्या व दुसरीकडे शासनाच्याच अधिकार्‍यांनी वृक्ष जतनाकडे दुर्लक्ष करायचे असा प्रकार होत असल्याची चर्चा या कारवाईमुळे नागरिकांमधून सुरु होती.