Breaking News

नौदलाकडे 2022 पर्यंत असेल भारतीय बनावटीची विमानवाहू नौका

Navy
नवी दिल्ली
संपूर्णपणे भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत पूर्णपणे कार्यरत होईल, असा विश्‍वास नौदल प्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी मंगळवारी व्यक्त केला. वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी नौदलासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर माहिती दिली.
भारतीय नौदलाकडे एकूण तीन विमानवाहू युद्धनौका असाव्यात, असे दीर्घकालीन नियोजन असल्याचे सांगून ते म्हणाले, देशासमोरील राष्ट्रीय सुरक्षाविषयक सर्व प्रकारच्या आव्हानांचा खंबीरपणे मुकाबला करण्यास नौदल तयार आहे. नौदलाकडून स्वयंसिद्धता आणि संरक्षणसिद्धता यांच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले टाळणे, त्यांचा मुकाबला करणे शक्य होते आहे. नौदल, तटरक्षक दलाच्या आणि इतर संस्थांच्या साथीने कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे करमबिर सिंग यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत नौदलासाठीची आर्थिक तरतूद 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पुढील काळात नौदलाच्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारकडून आणखी आर्थिक सहाय्य घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नौदलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात 20 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक निधीची गरज असल्याचे व्हाईस ऍडमिरल जी अशोक कुमार यांनी ऑक्टोबरमध्येच सांगितले होते. नौदलाच्या भांडवली स्वरुपाच्या खर्चासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 23,156 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.