Breaking News

उपमुख्यमंञीपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच,22 डिसेंबरला होणार फैसला

मुंबई
गुरुवारी महायुतीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विश्‍वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. एवढ्या घडामोडीत मात्र उपमुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करावी याबाबत अद्याप राष्ट्रवादीत निर्णय झालेला नाही.  उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चढाओढ असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री  पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीत यावर मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीने याबाबत आत्तापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत अजित पवार भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचे बंड थंड करण्यात शरद पवारांना यश आले आणि त्यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार  आता पुन्हा पक्षात आले असले तरी, त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले तर शिवसेनेकडून अजित पवार यांचा योग्य सन्मान राखला जायला हवा याविषयीही  राष्ट्रवादीच्या मनात चिंता आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठे नेते  म्हणून जयंत पाटील यांना ओळखलं जातं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयंत पाटील यांनी देखील शपथ घेतली आहे मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही.  विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर 22 डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.