Breaking News

हेगडे यांचा 40 हजार कोटींचा दावा खोटा : फडणवीस

Hegde Fadanvis
मुंबई
केंद्राचे 40 हजार कोटी परत पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे 80 तासांचे मुख्यमंत्री बनले होते, हा भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. हे संपूर्णपणे चुकीचे आहे. हा आरोप मी नाकारत आहे. अशी कोणत्याही स्वरुपाची घटना घडलेली नाही. मी एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही. हे 100 टक्के धादांत खोटे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेगडे कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, तुम्हाला माहीत आहे, फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केले ? आमच्याकडे बहुमत नाही हे माहीत होते, तरीही ते मुख्यमंत्री झाले. हाच प्रश्‍न प्रत्येकजण विचारत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणे हे पूर्वनियोजित होते. त्यांना महाविकास आघाडीचे सरकार या निधीचा गैरवापर करतील अशी भीती होती, असे हेगडे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फडणवीस हे त्या काळात काळजीवाहक मुख्यमंत्री होते. या काळात मुख्यमंत्र्यांना असे अधिकार असतात का हा प्रश्‍न आहे. विकास निधी हा वेगवेगळ्या प्रकल्यापासाठी मिळत असतात. ते वेगवेगळ्या मार्गाने फडणवीस यांनी परत पाठवल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी तर फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केल्याची टीका केली तर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी यात तथ्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पायउतार व्हावे लागेल, असा इशाराच दिला. फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हेगडे काय बोलले हे मला माहीत नाही. माध्यमांत जे येत आहे, ती मी पाहिले. राज्यात बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प सुरु आहे. तो केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. यासाठी एक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही फक्त जमीन संपादनाची आहे. बुलेट ट्रेन करता महाराष्ट्राला एकही पैसा मिळालेला नाही. जो पैसा येईल तो त्या कंपनीत जमा होईल. ज्यांना अकाऊंटींगची पद्धत समजते. त्यांना अशा प्रकारे काही पैसे पाठवता येत नाही हे माहिती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी एकही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. केंद्राने पैसे मागितलेला नाही आणि मागण्याचा विषयही नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


केंद्राचा पैसा वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री
केंद्र सरकारचे महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगवेगळया मार्गांने आलेले 40 हजार कोटी रुपये परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासाचे मुख्यमंत्री झाल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.  शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास ते या विकास निधीचा गैरवापर करतील म्हणून हे सर्व नाट्य घडवल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेगडे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हेगडे पुढे म्हणाले की, हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 15 तासांच्या आत 40 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले.