Breaking News

दिल्लीत लागलेल्या आगीत 5 मुलांसह 6 ठार

गाझियाबाद : लोनी परिसरात एका घरात लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे. या आगीच्या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरातील रेफ्रिझरेटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग काही वेळातच संपूर्ण खोलीत पसरली . यावेळी घरात असलेली 5 मुलं झोपली होती. हे मृत्यू आगीमुळे झाले की धुरामुळे श्‍वास कोंडून झाले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दिल्ली एनआरसीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिल्लीतील अनाज मंडीत लागलेल्या आगीत तब्बल 43 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ही आगही शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. दिल्लीच्या शालीमार बागेतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली होती. या आगीत तीन महिलांचा मृत्यू झाला होता. दिल्ली आणि परिसरात गेल्या 22 वर्षांमध्ये एकूण 5 भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 13 जून 1997 या दिवशी उपहार सिनेमा आगीत 59 लोक मृत्युमुखी पडले होते. सन 2011 मध्ये नंद नगरी भागात लागलेल्या आगीत 14 लोक ठार झाले होते. सन 2018 मध्ये बवाना येथे फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 17 लोकांचा मृत्यू झाला होता.