Breaking News

राज्याची केंद्राकडे 7 हजार 28 कोटींची मागणी

Flood
मुंबई
अवकाळी पावसामुळे 94 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे केंद्रीय पथकाच्या पाहणीत आढळून आले आहे. या नुकसानापोटी राज्य सरकारने केंद्राकडे सात हजार 28 कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची मागणी केली असून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्याची ग्वाही केंद्राने दिली आहे, असे मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.
अवकाळी पावसामुळे 34 जिल्ह्यांच्या 325 तालुक्यांतील 103 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने भात, कापूस, सोयाबीन, तूर ही पिके हातून गेली. एकूणच या संकटाचा फटका एक कोटीहून अधिक शेतकर्‍यांना बसला असून त्यांचे सात हजार 28 कोटींचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार, तर फळबागायती/बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत दिली जाणार असून त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
केंद्राने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अप्पर सचिव डॉ. वी. तिरूपुगल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक औरंगाबाद विभागात, कृषी विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक अमरावती आणि नागपूर विभागात, तर दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पाठविले होते. या पथकाने अहवाल केंद्रास सादर केला आहे. त्यामुळे राज्याला मिळणार्‍या मदतीबाबत त्वरीत निर्णर्याची अपेक्षा मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
आधीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित : राज्यात यापूर्वीही जुलै-ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत एकूण सात हजार 288 कोटींचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने त्या वेळी केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठविला असून तीही मदत प्रलंबित आहे.