Breaking News

शेेवगावात 75 वीजचोरांवर कारवाई


शेवगाव / शहर प्रतिनिधी ः 
महावितरणच्या शेवगाव उपविभागात वितरण रोहित्र सफाई अभियानांतर्गत 75 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. वीजचोरांनी या धडक मोहिमेचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसले.
महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता (ग्रामीण) मनीषकुमार सूर्यवंशी व अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवण्यात आले. धडक अभियानात शेवगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीशैल लोहारे, विभागीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागातील सर्व कक्ष अभियंता, तांत्रिक कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, सुरक्षारक्षक, तसेच अतांत्रिक कर्मचारी मिळून 113 जणांच्या पथकाने हे धडक अभियान राबविले.
या धडक अभियानांतर्गत या पथकाने एकाचवेळी प्रत्येक वितरण रोहित्रावरील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला. शून्य ते 30 युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजजोडणीची कसून तपासणी करण्यात आली. तसेच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांची स्थळ पडताळणीही यावेळी करण्यात आली. नियोजन व सूत्रबद्धरित्या राबविण्यात आलेल्या या मोहिमेने या संपूर्ण एका दिवसात तब्बल 75 वीजचोर या पथकाच्या जाळ्यात अडकले.
  या वीजचोरांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  183 थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. या प्रकारचे अभियान शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यात राबवून वीज चोरीला आळा घालणारा असल्याचे महावितरण अधिकारी यांनी सांगितले.