Breaking News

86 वर्षापूर्वीचा कसोटीतील विक्रम अबाधित

मुंबई 
 कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 106 फलंदाजांनी मिळून पदार्पणातच 108 शतके लावली आहेत. मात्र आतापर्यंत एकदाच असे घडले की दोन वेगवेगळ्या फलंदाजांनी कसोटी पदार्पण करताना एकाच दिवशी दोघांनीही शतकं झळकावले. तो दिवस होता रविवार, 17 डिसेंबर 1933, म्हणजे बरोब्बर 86 पूर्वी आणि सामना होता भारत विरुध्द इंग्लंड. भारताचा हा केवळ दुसराच आणि भारत भूमीवरचा हा पहिलाच कसोटी सामना होता. जिमखाना मैदानावरच्या त्या सामन्यात इंग्लंडच्या ब्रायन व्हलेंटाईनने पहिल्या डावात 136 धावा केल्या आणि भारताच्या दुसर्‍या डावात लाला अमरनाथ यांनी 118 धावा केल्या. दोघांचाही हा पहिलाच कसोटी सामना होता. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर 1933 रोजी ब्रायन व्हलेंटाईनने 79 धावांवरुन खेळायला सुरुवात केली आणि शतक पूर्ण केले. त्याला 136 धावांवर जमशेटजीने मर्चंट यांच्याकडून झेलबाद केले. इंग्लडचा पहिला डाव त्याचदिवशी आटोपला आणि भारताच्या दुसर्‍या डावात त्याच दिवशी तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना लाला अमरनाथ हे 102 धावांवर नाबाद परतले. याप्रकारे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संघाच्या फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतक साजरे केले. त्यानंतर आतापर्यंत आणखी 2125 कसोटी सामने खेळले गेले आहेत, भारतानेही आणखी 530 कसोटी सामने खेळले, आणखी 89 फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतकं केली पण असा विक्रम पुन्हा घडला नाही. विशेष म्हणजे कसोटी सामन्यात त्यावेळी पहिल्यांदाच रविवारी खेळ झाला आणि त्याच दिवशी व्हलेंटाईन व अमरनाथ यांच्या शतकांचा हा विक्रम घडला. कसोटी पदार्पणात आतापर्यंत 106 फलंदाजांची 108 शतके म्हणजे कुणीतरी एकापेक्षा अधिक शतके पदार्पणात केली आहेत आणि हे तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा एखादा फलंदाज आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावेल. तर आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकं करणारे असे दोन फलंदाज आहेतपहिला आहे वेस्ट इंडिजचा लॉरेन्स रो आणि दुसरा आहे पाकिस्तानचा यासीर हमीद. लॉरेन्स रो ने 1972 च्या किंग्स्टन कसोटीत न्यूझीलंडविरुध्द पहिल्या डावात 214 आणि दुसर्‍या डावात नाबाद 100 धावांची खेळी केली होती. यासीर हमीदने 2003च्या कराची कसोटीत बांगलादेशविरुध्द 107 व 105 धावांच्या खेळी केल्या होत्या.
पदार्पणात 99 धावांवर बाद झालेले दोनच
आणि कसोटी पदार्पणातच 99 धावांवर बाद झालेले म्हणजे फक्त एकाच धावेने शतक हुकलेलेही दोनच जण आहेत. पहिला होता आस्ट्रेलियाचा आर्थर चिपरफिल्ड (वि. इंग्लंड- 1934) आणि दुसरा होता वेस्ट इंडिजचा रॉबर्ट ख्रिस्तियानी (वि. इंग्लंड -1948).