Breaking News

महाविकास आघाडीसमोर कोल्हेकुईचे आव्हान!

पराभूत मानसिकता नेहमी रडीचा डाव खेळण्यास प्राधान्य देते आणि आव्हानाला सामोरे न जाता मैदानातून पळ काढते याचा वृत्तांत अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने याची डोळा पाहीला.महाराष्ट्र विधान सभेच्या दोन  दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अवघ्या तासाभरात भारतीय जनता पक्षाच्या पारदर्शी व्यक्तीमत्वाने दाखविलेला पळपुटेपुणा पोरसवदा प्रवृत्तीचे प्रतिनिधीत्व करतो.यापेक्षा या भुमिकेला अन्य नामाभिधान  देता येणार नाही.केवळ एखाद्या भांडखोर बाईप्रमाणे बोटे मोडत जोरजोराने ओरडून मैदान गाजविण्याचा शहाजोगपणा दाखविण्याचा हा प्रकार पवित्र सभागृहात निंदनीयच म्हणायला हवा.फडणवीस आणि एकुणच  भाजपासारख्या सुसंस्कृतपणाचा शहाजोगपणा मिरवणार्‍या राजकीय पक्षाला हे वर्तन अशोभनीय आहे.अशा प्रकारच्या कोल्हेकुई करून तीस वर्षाच्या जुन्या मित्राला अडचणीत आणण्याचा नाठाळपणा सत्तेच्या  वांझोट्यांकडून वारंवार झाला तर महाराष्ट्राला नवल वाटणार नाही.
महाराष्ट्राची सत्ता हातातून निसटल्याने जिंकूनही हरलेल्या फडणवीस आणि समर्थकांना बर्‍याच गोष्टी जिव्हारी लागल्यात.केंद्रात भरभक्कम सरकार असतांना ,कुणाचीही शेंडी कापण्याची हिंमत दाखवणारी जिद्द महाराष्ट ्रात प्रसूत झाली नाही हे शल्य महाराष्ट्र भाजपेयींच्या पराभूत मानसिकतेला डाचत आहे.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याशी काडीमोड झाला ही भावना त्यांना अस्वस्थ करीत आहे.एरवी अन्य कुणालाही महाराष्ट्रात सत्ता  मिळाली असती तरी भाजपाने विशेषतः फडणवीस यांनी एव्हढा आक्रस्ताळेपणा केला नसता.शिवसेनेचा त्यातही थेट उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने पोटशुळ अधिकच ठोसे मारू लागला आहे.
भारतीय जनता पक्षाची एकूणच राजकीय वाटचाल पाहीली तर शरद पवार यांच्यापेक्षाही  भाजपाचे राजकारण अविश्‍वासार्ह राहीले आहे.शरद पवार यांनी मिळालेल्या संधीचा फायदा त्यांच्याविषयी राजकारणात निर्माण  झालेला गैरसमज दुर गेला,शरद पवार यांना मिळाली तीच संधी महाराष्ट्राने भाजपाला दिली होती.त्याचा फायदा घेऊन प्रतिमा स्वच्छ  करण्याऐवजी विनाशकाली बुध्दी वापरून भाजपाने आपली प्रतिमा आणखी  मलीन केली आहे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत छोट्या आणि प्रादेशिक पक्षांच्या हाताला धरून आपला पसारा वाढविण्याचा प्रयत्न करणारा भाजपाचा स्वार्थ काढून घेतल्यानंतर मित्रपक्षांना गुलामासारखी वागणूक  देतो हे महाराष्ट्राने जवळून पाहीले आहे.
गेल्या तीस वर्षापासून महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेने भावासारखी साथ दिली.स्व.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे सर्व लाड पुरवले.पण सापाला दुध पाजण्याची आपली अंधश्रध्दा  घातच करते.याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला.अगदी 2014 च्या निवडणूका होईपर्यंत भाजपाला शेंबडे पोरही महाराष्ट्रात दगड मारण्याचे धाडस करीत होते.तेंव्हा शिवसेना ढाल बनून भाजपाचे संरक्षण करीत होती.याची  जाणीव भाजपाच्या विद्यमान नृतृत्वाने ठेवली नाही.मागच्या काळात थोड्या जास्त जागा मिळाल्या अन् त्यांना गगन ठेंगणे झाले.
2014 साली जे 122 आमदारांचे यश भाजपला मिळाले होते ते मुळात फडणवीसांचे यश होते का? हा मुद्दाही तपासायला हवा.  भाजप शिवसेना वेगळे लढूनही   जेष्ठ नेते एकनाथ खडसे , सौ . पंकजा मुंडे ,  विनोद तावडे , स्व.फुंडकर अश्या सर्वांनी मिळवलेले ते यश होते हे लक्षात घ्या.
यंदाही शिवसेना सोबत होती.तरी देखील 122 चे 105 झाले.जे निवडून आलेत त्यात जवळपास पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस ते तीस आमदार विरोधी पक्षांतून आयात केले आहेत.त्यांच्या विजयात फडणवीसांचा  तिळभरही वाटा नाही.यावरून त्यांचा जनाधार कसा आणि किती आहे हे लक्षात येते.
खुनशी आणि वर्चस्ववादी राजकारण फडणवीस यांच्या अधोगतीला कारणीभूत आहे.आणि म्हणूनच महाराष्ट्राने फडणवीसांना नाकाराले आहे हे त्यांची सदविवेक बुद्धीमान्य करायला धजावत नाही.आक्रस्ताळेपणा हा  त्यांचा स्थायीभाव आहे.विरोधी पक्षनेता असतांना महाराष्ट्राने पाहिलेला त्यांचा आक्रस्ताळेपणा जनतेला भावला होता.त्याला कारणही तसेच होते.जनतेच्या हिताच्या प्रश्‍नावर सभागृहाबाहेर आणि सभागृहातही ते हिरिरिने  भांडत असल्याचे जनतेला वाटत होते.कुठेही जाताना तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे वाहून नेण्यासाठी बैलगाडी सतत त्यांच्यासोबत असायची.तोपर्यंत फडणवीसांचे अंतर्मन महाराष्ट्राला माहीत  नव्हते.कथनी आणि करणीमध्ये अंतर ठेवावे लागते या धाटणीतले ते राजकारणी आहेत.याचा अनुभव जनतेला नव्हता म्हणून भोळ्या जनतेने भाबडेपणाने त्यांना डोक्यावर घेतले होते.तथापी गेल्या पाच वर्षातील  सरकारच्या कारभाराने त्यांचे अंतर्मन महाराष्ट्रासमोर आले.कथनीकरणीतील फरक समजला.
सख्या मित्राच्या पाठीत खंजीर तर खुपसलाच पण प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सुखदुःखालाही फोडणी देऊन वेदना दिल्या.हे थोड झाल म्हणून की काय शनिवारच्या सभागृहाच्या वर्तनाने तर  पांघरलेला बुरखा त्यांनीच फाडून आपला खरा चेहरा महाराष्ट्राला दाखवला.मतभेद असले तरी मित्राच्या आनंदात सहभागी होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.ती पंरंपरा त्यांनी अरबी समुद्रात विसर्जीत केली,या  विसर्जनासाठी त्यांनी वापरलेले निमित्त त्याहूनही निंदनीय आहे.महाराष्ट्राच्या अस्मितेला डागण्या देणारे आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्श्री शाहू महाराज,डा.बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या  दैवतांमुळे फडणवीस,तुम्ही आम्ही हयात आहोत.त्यांच्याच त्यागातून निर्माण झालेल्या स्वराज्यामुळे तुमचे राजकारण बहरले आहे.त्याची जाणीव ठेवण्याऐवजी त्यांच्याविषयी असुया आणि मनात असलेले पारंपारिक  विष तुम्ही ओकलात.महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही.