Breaking News

अपंगांना घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सवलत द्या


अहमदनगर प्रतिनिधी
शासन निर्णयानुसार पुणे छावणी परिषदेच्या धर्तीवर भिंगार छावणी परिषद हद्दीतील अपंगांना घरपट्टी पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी व्यवसायासाठी बाजारतळ येथे अधिकृत टपरीची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे कार्यालयीन अधिकारी स्नेहा पारनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, अपंगदिव्यांग अश्फाक शेख, सय्यद मुजाहिद, अमान शेख, तजमुल शेख, आवेज शेख, शाकीर शेख, असिफ अत्तार, नवेद शेख, शहेबाज शेख, कलीम शेख, मोईज  शेख, साजिद सय्यद, आसिफ अत्तार आदींसह अपंग बांधव उपस्थित होते. 
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या सन २००१ मध्ये अस्तित्वात आलेल्या अपंग कल्याण कृती आराखड्यामध्ये रोजगार स्वयंरोजगारविषयी उपाययोजनेच्या तरतुदी नुसार स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना केंद्र, शासनाच्या योजना, दारिद्रय निर्मूलन योजना याअंतर्गत किमान टक्के निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण पुनर्वसनकरिता राखून ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने दि. २९ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या टक्के निधीमधून जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या कोणत्या योजना राबवाव्यात,  याबाबत शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिलेले आहेत. पुणे छावणी परिषदेने अपंग बांधवांना घरपट्टी पाणीपट्टी मध्ये ५० सवलत  दिलेली आहे. अहमदनगर येथील भिंगार छावणी परिषदमध्ये आजपर्यंत अपंगांना कोणत्याही प्रकारची सवलती देण्यात आलेली नाही. तरी शासन निर्णयानुसार घरपट्टी पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी. तसेच शासनाच्या निर्णयाप्रमाणे भिंगार बाजार तळ येथे अपंगांना उदरनिर्वाह व्यवसायासाठी अधिकृतपणे टपरीची व्यवस्था करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.