Breaking News

निळवंडे कालव्यांचे काम संथगतीने पाटपाणी कृती समितीचा दावा


कोतूळ / प्रतिनिधी ः
निळवंडे कालव्यांच्या पाहणीसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर आले होते. त्यावेळी निळवंडे कालव्यांची कामे अतिशय संथगतीने सुरु असल्याचे पाटपाणी कृती समितीचे कार्यकर्ते म्हणाले. यानंतर कार्यकर्ते आणि कालव्यांची कामे करणारे अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. 
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील बैठकीत निळवंडे कालव्याची कामे जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर  ठेकेदाराने निळवंडे कालव्यांच्या कामात सुधारणा केली की नाही याची खात्री करण्यासाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे कार्यकर्ते कामाच्या प्रत्येक ठिकाणाला भेट देत आहेत. यामध्ये समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे, विठ्ठल घोरपडे, दत्ता भालेराव, शिवाजी शेळके, सौरभ शेळके, मोहन शेळके, प्रभाकर गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर अकोले दौर्‍यावर आले. हे समजल्यावर समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. कालव्यांच्या कामाची गती अतिशय संथ असल्याचे कोहिरकर यांच्या लक्षात आले. कोहिरकर यांच्यासमोर न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकार्‍यांकडून विविध कारणे सांगितली जात होती. यावेळी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके व राजेंद्र सोनवणे यांनी या तक्रारी कशा खोट्या आहेत हे पुरव्यानिशी सिद्ध केले. यानंतर कंपनीचे अधिकारी व समिती कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. हे वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच कोहिरकर व कार्यकारी अभियंता भरत शिंगगाडे यांनी मध्यस्थी करून यावर पडदा टाकला.
निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या 27 कि. मी. च्या कामाची प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली. पहिल्या 27 कि. मी. मध्ये न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनीचे चार ते पाच ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्याची गतीही अतिशय कमी आहे. तर 15व्या कि.मी मध्ये जे.डी. दिघे कंपनीच्या कामाची गती चांगली आहे. परंतु त्या तुलनेत न्यु एशियनची गती अतिशय नगण्य आहे. पहिल्या 27 कि. मी. मध्ये एकूण 88 बांधकामे आहेत. त्यापैकी मोठी बांधकामे 23 आहेत. त्यात 7 बांधकामे अतिशय मोठी आहेत. परंतु यापैकी तीनच बांधकामे पूर्ण झाली आहेत. एकूण 88 पैकी 14 कामे पूर्ण झालेली आहेत. सहा ते सात बांधकामे सध्या चालू आहेत. उर्वरीत 60 ते 65 बांधकामांना ठेकेदाराने हातही लावलेला नाही. यातील बहुतांश कामांसाठीची जागा 2012 सालीच जलसंपदा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ठेकेदाराने त्यावेळी येथील पाया देखील उकरला आहे मात्र कामाला अद्यापही सुरुवात केलेली नाही.
     


जुनाट मशिनरीने कामे होणार कशी
न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनीची बांधकामे ज्या ठिकाणी चालू आहे, त्यांची गती तर अगदी संथ आहेत. या ठिकाणी असलेली मशिनरी ही जुनाट आहे. ती सध्याच्या परिस्थितीत कालबाह्य झालेली आहे. जेथे एकावेळी 50 ते 60 गोण्या सिमेंटचे एकत्रिकरण होणारी मशिनरी पाहिजे त्या ठिकाणी या ठेकेदाराकडे दोन ते तीन सिमेंट गोण्या एकत्रिकरण होईल, अशी मशिनरी आहे. ज्या ठेकेदाराने धरणाच्या कामाला 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लावला त्याच ठेकेदाराकडून पन्नास किलो मीटरच्या कालव्यांची कामे कशी पूर्ण होतील असा प्रश्‍न समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.