Breaking News

शिर्डी महोत्सवासाठी विशेष व्यवस्था


शिर्डी / प्रतिनिधी ः
शिर्डी महोत्सवानिमित्त 31 डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ही माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
  ते म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात 58 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे.  अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साईधर्मशाळा, भक्तनिवासस्थान येथे 35 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. साईभक्तांना लाडू प्रसाद पाकिटांचा लाभ सुलभतेने मिळावा म्हणून गेट नंबर चारजवळ दोन अतिरिक्त लाडू विक्री काऊंटर सुरु करण्यात येणार आहेत.
दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावी यासाठी साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान, व्दारावती भक्तनिवासस्थान, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर, भक्तनिवासस्थान मंडपात, सर्व्हे नंंबर त्रिकोणी जागेतील मंडपात आणि साईनिवास अतिथीगृहाच्या समोरील बायोमॅट्रीक काऊंटर समोरील मंडपात चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे. भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, साईआश्रम, जुने साईप्रसादालय दर्शन रांगेजवळ व नवीन श्री साईप्रसादालय या ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तातडीचे सेवेसाठी या ठिकाणी रुग्णवाहीका तयार असणार आहेत.
सुरक्षेची विशेष काळजी...
सुरक्षेसाठी 50 अतिरीक्त सीसीटीव्ही कॅमेरे, 7 एल.ई.डी. स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेकामी एक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरिक्षक, 75 पोलिस कर्मचारी, एक शीघ्र कृतीदल पथक (20 व्यक्ती), एक बॉम्ब शोधक पथक नेमण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी अतिरिक्त 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त संस्थानचे एक हजार 107 सुरक्षा कर्मचारी आहेत. सशुल्क  पासेससाठी तीन अतिरिक्त काऊंटर सुरु करण्यात आले आहे.