Breaking News

लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाने केला अत्याचाराचा निषेध


अहमदनगर प्रतिनिधी
मुलींवर होणार्या अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील मरोडा (ता. अकोट) गावात मातंग समाजातील मुलीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील एकाही आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ अटक करुन फाशी देण्याची मागणी लहुजी शक्ती सेना आणि सकल मातंग समाजाच्यावतीने करण्यात आली. 
अकोट या गावात एका युवतीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक बलात्कार करुन तिला तिच्याच घरी फासावर लटकविण्यात आले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपी अजूनही मोकाटच आहेत. या घटनेचा खटला जलदगती कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी. तत्पूर्वी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करणार्या पोलीसांनादेखील सहआरोपी करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा भारतीय लहुजी सेना, अण्णाभाऊ साठे युवक संघटनेने देखील निषेध नोंदविला आहे.
या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार (गृह) राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष सुनिल सकट, भारतीय लहुजी सेनेचे संपर्क प्रमुख तथा अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव काते, आकाश शिंदे, विकास शिंदे, शरद खंडागळे, मार्कस खंडागळे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.