Breaking News

‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’नवीन वर्षाची सुरवात मोठ्या उत्साहात होणार आहे. आपला हा चालु वर्षातला शेवटच्या आठवड्यातील प्रवास असुन आपल्याला या वर्षाला भावनाविवश होउन निरोप देण्याची घटिका समीप येवुन ठेपली आहे. वर्षे येत-जात राहतात पण जाता-जाता चांगल्या आणि वाईट आठवणींचे गाठोडे आपल्या स्वाधीन करुन जातात. वाईट आठवणी अनेक वर्षांपर्यंत आपल्याला सतावत राहतात किंबहुना मरेपर्यंत त्या आठवणी आपली पाठ सोडत नसतात. जोपर्यंत हा देह पंचतत्वात विलिन होत नाही तोपर्यंत आठवणी मानवाला सोबत करतात पण ती सोबत खुपच दर्दनाक असते. गेलेले दिवस पुन्हा येत नसतात पण माणसाच्या मनाला वाटते की ते मंतरलेले दिवस पुन्हा यावेत. ते वर्षे पुन्हा यावेत पण ते येत नसतात हेच दुःखाचे मुळ कारण असते. या सर्व गोष्टींमधून मार्ग काढत आपल्याला जगायचे असते. गेलेल्या वर्षाने आपल्याकडुन काय हिरावून घेतले यापेक्षा आपल्याला काय दिले याचा विचार आपण केला तर येणारे वर्षही आपल्याला तितकेच सकारात्मक आणि आनंदी गेल्याशिवाय राहणार नाही. गतवर्षाने अर्थात चालु वर्षाने आपल्या प्रत्येकाला खुप चांगले, वाईट अनुभव दिले असतील. प्रत्येक वर्षी प्रत्येकाच्या आयुष्यात खुप चांगले लोक येतात. चांगली नाती तयार होतात. काही लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की ते आपल्या आयुष्यातुन निघुन जातात. काही चांगली नाती तुटतात आणि लोक आयुष्यातुन निघुन जावुन आयुष्य रितं करुन सोडतात आणि त्याच दुखाला कवटाळून बसत आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्षातील नवा आनंद हरवुन जीवन निरस करुन टाकतो. म्हणुन प्रत्येकाने जे सोडायचे आहे ते वेळीच जुन्या वर्षातच सोडुन यायचे आहे.  कवी केशवसुत यांनी अशा लोकांना खुप मार्मिक शब्दात सुचनावजा इशारा केला होता, जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका म्हणून आपल्याला नवीन वर्षात प्रवेश करताना जुने जाऊन द्यायचे आहे अर्थात सोडुन द्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण वर्ष सोडतो त्याचप्रमाणे ज्या लोकांवर आपण खूप प्रेम केले पण ते आपल्याला सोडून गेले त्यांनाही आपण त्याच वर्षात सोडून यायचे आहे. विसरून यायचे आहे. आठवणींना जाळून किंवा पुरून टाकून नवीन वर्षात प्रवेश करायचा  आहे. त्या आठवणी उगाळत बसल्याने आपले आयुष्य कधी उगाळत जाईल हे आपल्याला पण समजणार नाही. आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या लोकांना एक दिवस पश्चाताप येतो आणि ते पुन्हा येतात यावर विश्वास असावा.
दरवर्षी आपल्याला चांगले मित्र भेटतात. चांगल्या मैत्रिणी भेटतात. त्यातील काही खास होतात, काही जीवा-भावाचे होतात, काही जीवाचे होतात, तर काही आपला जीवच होऊन जातात पण जे आपल्या आयुष्यात राहतात ते नेहमी आनंद देतात. जे निघुन जातात ते खुप वेदना देऊन जातात आणि आपण कारणे शोधण्यासाठी वर्षानुवर्षे वाया घालवतो. म्हणुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सर्व तेथेच सोडून द्यायचे आहे. आपल्याकडे आनंदाने जगण्याची गुरुकिल्ली असेल तर नवीन वर्षात आपल्याला खुप चांगले-चांगले लोक भेटतील. जे आपल्यासोबत वाईट वागले त्यांचेही आभार माना. ज्यांनी धोका दिला त्यांचेही आभार माना. ज्यांनी आपल्यावर गलिच्छ आरोप केले, शंका घेतल्या, षडयंत्र रचली अशा सर्वांचे आपण मनोमन आभार मानून त्यांचेही शुभ चिंतायचे आहे. अशा लोकांमुळेच तर आपण नवीन वर्षात नवीन जगणे शिकलो आहोत. नवीन वर्षात काय करायचं, तर टेन्शन घ्यायचे नाही. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य अगदी बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचे, कधीच काही कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणी गेलं म्हणुन कुणासाठी वाईट वाटुन घ्यायचे नाही, लोकांचे खुप चेहरे असतात, दाखवायचा एक असतो आणि त्या चेहर्यामागे एक लबाड माणुस लपलेला असतो. आजकाल लोक देवावर सुध्दा नाराज होतात. कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो वा आपल्या मागे जळु द्या आपले आपले मार्गक्रमण करत राहायचे आहे, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही, आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतः बरोबर दुसर्याचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही.  जे आयुष्यात आले त्यांचे पण आभार मानायचे, जे गेले त्यांचे पण आभार मानायचे, जे येतात ते स्वार्थासाठी येतात. जाणारे पण स्वार्थासाठी जातात. जे खोटे बोलले त्यांचे पण आभार माना. ज्यांनी मोका दिला त्यांचेही खूप खूप आभार मानायचे आणि ज्यांनी मोका दिला त्यांचे पण आभार मानायचे. ज्यांनी आनंद दिला त्यांचे पण आभार मानायचे आणि ज्यांनी दुःख पिडा दिल्या त्यांचे पण आभार मानायचं.  एवढचं लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे त्यांना आनंद भेटला हीच आपली जमेची बाजू आहे.  हुरहुर वाटुन द्यायची नाही. भुरभुर वाटून द्यायची नाही. कोणी सोडून गेले म्हणून असुरक्षित वाटू द्यायचे नाही. कोणाची उणीव भासू द्यायची नाही. कोणाची कमजोरी व्हायची नाही. कोणी कोणाचे नसते हेच खरे असते. कोणी कोणासाठी मरत नसते तसेच कोणी कोणी कोणासाठी जगतही नसते. जो तो आपापल्या धुंदित असतो. मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही ही एक म्हण आहे, सत्य नाही. मृत्यू हेच सत्य आहे आणि जगण्यासाठी अन्न लागते हेही एक सत्य आहे आणि ते अन्न मिळविण्यासाठी पैसे कमवावे लागतात हेही एक अंतिम सत्य आहे पण ते सत्य मानवाला अंतिम संस्कारांच्या वेळेपर्यंत समजत नाही. मन पाखरु असते म्हणून त्याला जग खरे भासते. जगाची रीतच अशी असते. चहात माशी पडली तर चहा फेकून देतात पण तिच माशी साजुक तुपात पडली तर माशी फेकुन देतात. एक गोष्ट  लक्षात ठेवायची. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक जण गरजवंत असतो. गरज संपली की निघून जातो. जो गरज संपली तरी थांबतो तो आपला असतो. प्रेम करायला शिका तसेच माणसे ओळखायलाही शिका. काय कदाचित एखादी प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला बरबाद करायला आलेली असु शकते आणि एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी असु शकते. सगळेच जग चांगले नसते. आपण मुर्ख असतो. आपल्याला वाटतं की समोरचाही आपल्या सारखाच सरळ आहे, म्हणून कुणाच्या दिसण्यावर जायचे नसते तर असण्यावर जायचे असते. जशी पुस्तकं वाचल्याशिवाय समजत नाही तशी माणसे वाचल्याशिवाय समजत नाहीत. नवीन वर्षात आपण अशा प्रकारे अनुकरण करून जगायला शिका. वर्ष खुप आनंदात जाईल. अपेक्षाभंग होण्याची वेळ येणार नाही. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह माझ्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
-          दत्ता पवार