Breaking News

देशभरात एक जूनपासून ’एक देश, एक रेशन कार्ड’

रामविलास पासवान यांची माहिती

Ration Card
नवी दिल्ली
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून, संपूर्ण देशभरात आता ’एक देश- एक रेशनकार्ड’ ची मोहीम राबविणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या एक जूनपासून देशात एक देश, एक रेशनकार्ड सुरू करणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार आहे. या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.
’एक देश, एक रेशन कार्ड’ या नव्या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असून रोजगारानिमित्त स्थलांतर करणार्‍या गरिब कामगारांना आपल्या रेशन कार्डावर कोणत्याही राज्यात, कोणत्याही ठिकाणी धान्य घेणे शक्य होणार आहे. या बदलामुळे अधिक कार्ड जवळ बाळगण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे. सतत स्थलांतर करणार्‍या कामगारांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे स्थलांतर करणार्‍या कामगारांना पूर्ण अन्न सुरक्षा मिळणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थी कोणत्याही एका शिधावाटप दुकानाशी बांधलेले राहणार नसल्याने त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे, असे रामविलास पासवान यांनी सांगितले. या निर्णयामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसणार असल्याचे पासवान म्हणाले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत याची माहिती दिली. ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात एक जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सध्या रेशन कार्डसाठी 14 राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच 20 राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुढील एक जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर वन नेशन, वन इलेक्शन राबवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. परंतु, सत्ताधारी भाजपच्या या मोहिमेला काँग्रेससह विरोधकांनी विरोध दर्शवला होता.