Breaking News

हुबळीतील रणजी लढतीत आर्यन जुयलचे शतक

हुबळी : युवा फलंदाज, सलामीवीर आर्यन जुयलने तडफदार शतक झळकावल्यानंतर यामुळे उत्तर प्रदेशला कर्नाटकविरुद्ध येथील इलाईट ब गट रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी 5 बाद 232 धावांपर्यंत मजल मारता आली. केएससीए हुबळी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या लढतीत 18 वर्षीय आर्यनने 251 चेंडूत 11 चौकारांसह 109 धावांची खेळी साकारली. त्याने अनावश्यक फटके टाळत धीरोदात्त फलंदाजीवर भर दिला आणि सहजपणे शतक साजरे केले.
जुयलला पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद सैफने (124 चेंडूत 8 चौकारांसह 56) समयोचित साथ दिली. या जोडीने 109 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्यात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, जुयलने सहकारी सलामीवीर अल्मास शौकतसह (76 चेंडूत 3 चौकारांसह 22) सलामीला 56 धावा जोडल्या. बेळगावचा वेगवान गोलंदाज रोनित मोरेने शौकतला आर. समर्थकरवी झेलबाद केले. त्यानंतर अभिमन्यू मिथुनने माधव कौशिकला (37 चेंडूत 15) बाद करत उत्तर प्रदेशची स्थिती 2 बाद 80 अशी केली. तिसऱया स्थानावरील अक्षदीप नाथही (26 चेंडूत 9) स्वस्तात परतला आणि संघाची 3 बाद 109 अशी घसरगुंडी उडाली. पण, एका बाजूने सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असले तरी याचा जुयलच्या एकाग्रतेवर अजिबात परिणाम झाला नाही. त्याने चौथ्या गडयासाठी सैफसमवेत 109 धावांची भागीदारी साकारत डाव सावरला. या जोडीने विशेषतः खराब गोलंदाजीचा समाचार घेण्यावर अधिक भर दिला. या जोडीमुळेच उत्तर प्रदेशला 200 धावांचा टप्पा सर करता आला. नंतर मिथुनने जुयलला देवदत्त पड्डिकलकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी सैफ व सौरभ कुमार (नाबाद 12) क्रीझवर होते. कर्नाटकतर्फे मिथुनने 45 धावात 3 बळी घेतले तर रोनित मोरे (1-22), श्रेयस गोपाल (1-45) यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला. आता दुसऱया दिवसाच्या खेळात कर्नाटकचा संघ उत्तर प्रदेशचा पहिला डाव शक्य तितक्या लवकर गुंडाळण्यावर भर देईल.