Breaking News

पॉस मशीनवरील धान्य वितरणाचा बोजवारा विविध तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक,वितरक हैराणनेवासे/प्रतिनिधी
 रेशन दुकानांवर होणारे धान्यवितरण पॉस  मशीनद्वारे वितरित करण्यात येत आहे. परंतु सदरच्या पॉस  मशीनद्वारे वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा तक्रारी धान्य दुकानदार करत आहेत. रेंज नसणे, नेटवर्क प्रोब्लेममुळे सर्वर डाऊन होणे आदी तक्रारी येत असल्याने नागरिकांना  दुकानासमोर तासनतास थांबावे लागत असल्याने धान्य वाटपाचा बोजबारा उडाला आहे.
 राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानात होणारा गैर व्यवहार रोखण्यासाठी चिठ्ठीद्वारे बिल करता ते मशीनद्वारे करुन धान्य वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय गोरगरीबांच्या हिताच्या ऐवजी अडचणीचा ठरु पहात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.   दुकानदारांना देण्यात आलेले मशिन हे निकृष्ट स्वरुपाचे असल्यामुळे रेंज मिळत नाही. वारंवार मशिन बंद पडते. अशा तक्रारी दुकानदारांनीच केल्या असून यामुळे ग्राहकही वैतागले आहेत. त्यामुळे पूर्वीचीच  पद्धत सुरु करावी अशी मागणी ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
 सरकारने नेमलेल्या ठेकेदाराने संगणकात महिती भरताना त्यात अनेक चुका केल्या आहेत. योजनेमधील ग्राहकांची नावेच गायब झाली आहेत. विशेष म्हणजे दुकानदारांनी स्वतः ही महिती भरण्यासाठी ठेकेदाराने नेमलेल्या माणसांच्या शेजारी बसून त्यांना मदतही केली होती. अनेकदा अंगठा मशिनवर ठेवणारा एक मशिनच्या स्क्रीनवर येणारे नाव भलतेच असा प्रकारही घडत आहे. महिती संकलनावेळी गोंधळ झालेला आहे. आता वाटप मशीनच तग धरत नसल्याने दुकानदार ग्राहकांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. धान्य वितरणाचा हा गोंधळ नेवासे तालुक्यात सर्वत्र दिसत असल्यामुळे धान्य वितरण व्यवस्थाच कोलमडल्याचे दिसत आहे. यावर योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


 सर्व शिधाधारकांना धान्य मिळावे अशी आमची सेवाभावी वृत्तीने अपेक्षा असते. मात्र कधी कधी पॉस मशिनची रेंज जाणे, कधी कधी अंगठयासह इतर बोटांचे ठसे न उमटणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे वंचित ग्राहकांबरोबर आम्हाला देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 -  शांताराम गायके, स्वस्त धान्य दुकानदार, नेवासे


 धान्य कधी वेळेवर येत नाही. आले तर ठसे न उमटणे असे प्रकार निदर्शनास येतात. त्यामुळे आम्हाला धान्यापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे पॉस मशीनवरील ठसे प्रक्रिया बंद करण्यात येऊन पूर्वी प्रमाणे धान्य वितरित झाल्यास सर्वसामान्य वंचित शिधाधारकांना धान्य मिळू शकेल.
 - सीमा नितीन कदम
  शिधाधारक