Breaking News

डंपरमुळे भोजडे, संवत्सर रस्त्याची दुरवस्था


कोपरगाव /शहर प्रतिनिधी ः
अतिवजनाच्या डंपरमुळे तालुक्यातील भोजडे आणि संवत्सर येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बुधवारी या भागात झालेल्या पावसामुळे हे रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलातून वाट काढणे जिकीरीचे ठरत आहेत. या रस्त्यांवरुन मोटारसायकल चालक घसरुन पडल्याचे प्रकार बुधवारी आणि गुरुवारी घडले.

समृद्धी महामार्गाचे कामावर सुरु असलेल्या अतिवजनदार डंपरमुळे भोजडे, भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. त्यातच बुधवारी झालेल्या पावसामुळे या रस्त्याला खूपच दयनीय अवस्था आली आहे. या चिखलातून वाहनानेच काय परंतु पायी चालणेही मोठे कसरतीचे ठरत आहे. वाहने घसरण्याचे अनेक प्रकार गेल्या दोन दिवसांत या रस्त्यावर घडले. चारचाकी वाहने घसरुन रस्त्याच्या खाली उतरत आहेत. काही वाहने जागेवरच अडकून पडत आहेत.
भोजडे ते वारी रस्त्यावरून गावाच्या बाजूने सतत डंपर जातात. हे डंपर समृद्धी महामार्गातील कामासाठी मालवाहतूक करणारे आहेत. या वाहनांमुळे या रस्त्यावर खूपच माती साचलेली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस अपेक्षित नसताना बुधवारी अचानक या भागात पाऊस झाला. त्यामुळे या रस्त्यावर चिखल झाला. हा चिखल इतका चिकट आहे की वाहने त्यावरुन घसरत आहेत. दुचाकी चालकांना चांगलीच कसरत करण्याची वेळ या रस्त्यावर येत आहे. या रस्त्यावर मुरुमच नसल्याने सर्वत्र चिखलच दिसून येत आहे.
चिखलामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. हीच परिस्थिती संवत्सर -कान्हेगाव रस्त्याची आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्यांवर मुरूम टाकावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.