Breaking News

पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषणपाथर्डी/प्रतिनिधी ः
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बेपर्वा कारभाराविरोधात माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने रुग्णालयासमोर शनिवारी साखळी उपोषण करण्यात आले.
नगरसेवक दीपाली बंग, रामनाथ बंग, अण्णा हरेर, शाहनवाज शेख, चंद्रकांत वाखुरे, अभिजीत गुजर, मनोज गांधी, परवेज मणियार, गणेश सोनटक्के, ज्ञानेश्‍वर कोकाटे, राजेंद्र दुधाळ, इजाज शेख, सुलभा बोरुडे, हाजी शकील  बागवान, अक्रम आतार, सलीम शेख आदी नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.   
उपजिल्हा रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍याची कायमस्वरूपी नेमणूक करावी. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या लस उपलब्ध असाव्यात, गोर गरीब रुग्णांना महागडे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी खासगी मेडिकलमध्ये पाठवू नये. रुग्णालयात स्वच्छता असावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपोषणकर्ते उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात साखळी उपोषणाला बसले. यानंतर काही वेळात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर येथे सविस्तर चर्चेसाठी आले होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येणार्‍या दोन ते तीन महिन्यांत सर्व प्रश्‍न सोडवण्याचे लेखी आश्‍वासन मुरंबीकर यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.