Breaking News

देशात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

Rahul gandhi
रांची
भाजप सरकार आदिवासींची जमिन हिसकावून घेत असून, ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रकार देशात सुरु आहे. देशात मोदी यांचे सरकार नसून, अंबानी-अदानी यांचे सरकार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केली. निवडणूक प्रचारासाठी झारखंड दौर्‍यावर आलेल्या राहुल गांधी हे सिमडेगा येथील रॅलीला संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर चौफेर हल्ला चढवला. अनेक दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणांतून दूर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले.
झारखंडच्या निवडणुका या पाच टप्प्यात पार पडणार असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक असलेले राहुल गांधी यांनी सिमडेगा या ठिकाणी सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरने आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी झारखंडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरपीएन सिंह, सुबोधकांत सहाय आदी नेत्यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात बिरसा मुंडा, जयपाल सिंह मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला. बिरसा मुंडा यांनी समस्त समाजाला योग्य रस्ता दाखवण्याचे काम केले. झारखंडमध्ये पैशांची काही कमी नाही. पाणी, जंगल, खनिज आदी प्रचंड प्रमाणात आहेत. हे सर्व छत्तीसगडमध्येही आहेत. एका वर्षात काँग्रेसने छत्तीसगडचा चेहरा-मोहरा बदलला आहे. याआधी छत्तीसगडमध्ये आदिवासींची जमिनी बळकावल्या जात असत. परंतु, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक कायदा केला. जो गरीब, शेतकरी, आदिवासी यांच्या जमिनीचे संरक्षण करीत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकारने आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्या उद्योगपतींना दिल्या. काँग्रेसचे सरकार झारखंडमध्ये आपल्या जमिनींचे संरक्षण करेल. बेरोजगारीसाठी काँग्रेसला काम करायचे आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाईल. नोटबंदी दरम्यान सर्व गटातील लोकांना नाहक त्रास झाला. केंद्र सरकारने 15 उद्योगपतींचे कर्ज माफ केले. परंतु, शेतकर्‍यांचे नाही. जीएसटी आणले. परंतु, गब्बर सिंह टॅक्सचा कोणालाही फायदा झाला नाही. झारखंडमध्ये शेतकर्‍यांचे व गरीबांचे सरकार बनेल. सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांचे संरक्षण केले जाईल, सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले.