Breaking News

दहा वर्षांतील निचांकी साखर उत्पादनाचा अंदाज


पुणे : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाची अतिवृष्टी या कचाट्यात ऊस गाळप हंगाम सापडला आहे. गेल्या दहा वर्षांतील निचांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर हंगाम केवळ 90 दिवस चालणार आहे. साखरेचे उत्पादन 55 लाख टनापर्यंत घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात 52.20 लाख टनांची घट होईल.
देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सुमारे 40 टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टी व गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊसक्षेत्र यामुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मराठवाडा व सोलापुरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील 30 टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम 90 व कर्नाटकातील गाळप हंगाम 100 दिवस चालेल. उत्तर प्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमधे राज्यात आलेल्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.