Breaking News

महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही

बेंगळुरू : कर्नाटकमधील कनसेच्या नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केल्याचे पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती. कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते.
यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल शिवसेनेने सीमेवर जाऊन तिरडी यात्रा काढत आंदोलन केले होते. यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बेळगावमध्ये मराठी पाट्या काल तोडण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यानंतर शिवसेनेने कोल्हापुरमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पांचा पुतळा जाळला. या वादावर आज येडीयुराप्पा यांनी भाष्य केले असून महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे. महाजन कमिशनच्या निर्णयानुसार कोणता भाग महाराष्ट्राला द्यायचा आणि कोणता कर्नाटकला हे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अशाप्रकारचा वाद निर्माण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीत उमटायला सुरु झाल्यानंतर सीमावासियावरील अन्यायाच्या विरोधात शिवसेनेतर्फे कोल्हापुरात रविवारी निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा त्यांनी निषेध करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर चौक इथं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचं दहनही करण्यात आलं. इतक्यावर हे आंदोलन न थांबता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले. कोल्हापूर एसटी आगारातून कर्नाटकात जाणार्‍या बसेस बंद ठेवण्यात आल्या. भीमाशंकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद लगेचच बेळगावातही पडले. संतप्त शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. त्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. परिणामी महाराष्ट्रातून एकही बस कर्नाटकात गेली नसून, कर्नाटकातूनही एकही बस राज्यात दाखल झालेली नाही. प्रवाशांना या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी दोन्ही बाजूंकडून बस सेवा स्थिगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.