Breaking News

खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण


मार्गशिर्ष 30 दर्श अमावस्या म्हणजेच 26 डिसेंबर 2019. तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच 2010 सालानंतर कंकणाकृति सूर्यग्रहणाचा अविष्कार नभांगणात दिसणार आहे. 26 डिसेंबरला सकाळी 8 ते 11.30 या वेळेत आपणास हे ग्रहण दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळेस हे ग्रहण सौदी अरेबिया  मध्ये सुरू होत असून तिथून चंद्राची सावली पृथ्वीवर पडण्यास सुरूवात होईल. ही सावली सकाळी 8 च्या सुमारास सौदी अरेबिया, कतार, ओमानमधून भारतात येईल. चंद्राची 120 किलोमीटर रूंदीची दाट छाया केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतून प्रवास करून श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरमार्गे सूर्यास्तास प्रशांत महासागरात पोहोचेल. चंद्राची सावली जवळजवळ 13000 किलोमीटर लांबीचा प्रवास 3-3 तासात पूर्ण करेल.
...............................

या ग्रहणात सूर्यबिंबाचा 97% भाग चंद्राआड लपत असून सूर्याची कंकणाकृति अवस्था (100%) जास्तीत जास्त 3 मिनिटे 40 सेकंदभर भारताच्या दक्षिणेकडील भाग मदुराई (3 मिनिट 12सेकंद), तीरप्पुर ( 3 मिनिट 12सेकंद), कोईम्बतुर ( 3 मिनिट 3 सेकंद) दिसणार आहे. भारताच्या इतर ठिकाणापैकी अहमदनगर (80%), सोलापूर (81%), पुणे (79%), मुंबई (79%) आणि नाशिक येथे (74%) ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाची ही अवस्था खंडग्रास सूर्यग्रहणाची असेल.
ग्रहणे का होतात?
ग्रहण हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार असून सूर्याभोवती पृथ्वी आणि चंद्र फिरत असतात. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी या तिघांच्या लपंडावामुळे ग्रहणाचा अविष्कार दिसतो. चंद्र आणि पृथ्वी स्वयंप्रकाशित नसल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या अवाढव्य सावल्या अंतराळात पडलेल्या असतात. पृथ्वीच्या शंखाकृती सावलीत चंद्र आल्यास चंद्रग्रहण पौर्णिमेस घडतं तर अमावस्येचा चंद्र सूर्यासमोरून जाताना त्याची सावली पृथ्वीवर ज्या भागात पडते तिथून सूर्यग्रहण दिसते. ग्रहण घडण्यासाठी पृथ्वी, चंद्र, सूर्य हे एकाच सरळ ओळीत यावे लागतात. ही घटना दर अमावस्या आणि पौर्णिमेला घडतेच. सूर्यग्रहणाच्या वेळी बर्‍याच  अमावस्येला चंद्राच्या सावलीच्या बाजूनं पृथ्वी गेल्यानं चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आणि त्या अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. एका वर्षात जास्तीत जास्त सात चंद्र आणि सूर्यग्रहणे होतात. यापैकी 4 ते 5 सूर्यग्रहणे असतात. जरी सूर्य, चंद्र, पृथ्वी एकाच सरळ रेषेत येत असले तरी चंद्राच्या कक्षेने पृथ्वी सूर्य पातळीशी (आयनिक वृत्त) पाच अंशाचा कोन केलेला आहे. या दोन्ही कक्षा जिथं छेदतात त्याच ठिकाणी चंद्र-सूर्य आल्यास ग्रहणे घडतात. या छेदन बिंदूस आपण राहू-केतू म्हणतो. थोडक्यात चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका ओळीत एक विशिष्टस्थानी आल्यासच ग्रहण घडते.
सूर्यग्रहणाचे प्रकार - खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृति हे होत.  सूर्यग्रहणाच्यावेळी अमावस्येचा चंद्र सूर्यासमोरून प्रवास करतो आणि चंद्राची दाट सावली पृथ्वीवर पडते. ही सावली शंखाकृती असते. पृथ्वीपर्यत ही सावली पोहोचेपर्यत तिचा व्यास अवघा 300 किलोमीटरच्या आसपास एवढा छोटा होतो. या भागात सूर्य पूर्णपणे झाकला जातो आणि खग्रास सूर्यग्रहणाची अवस्था त्या प्रदेशात दिसते. त्याचवेळी चंद्राची विरळ सावली पृथ्वीवर काही हजार किलोमीटरपर्यत पडत असल्याने त्या भागात खंडग्रास ग्रहण दिसतं. ह्या भागात सूर्यबिंब 100% न झाकले जाता काही प्रमाणात ते झाकलं जातं. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त 7 1ड़2मिनिटे पहावयास मिळते.   
कंकणाकृति सूर्यग्रहण - या ग्रहणात चंद्रबिंब पूर्णपणे सूर्यबिंबाला पूर्ण झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्यबिंबाची कड प्रकाशित राहून सूर्याभोवती (सूर्याच्या परीघाच्या आत) कंकण दिसते. त्यामुळे अशाप्रकारच्या ग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
चंद्र आणि सूर्य यांचे आकार वेगवेगळे असले तरी ते दोन्ही आपल्याला एकसारखे दिसतात. याला कारण म्हणजे चंद्राच्या व्यासापेक्षा सूर्याचा व्यास सुमारे 400 पट मोठा असला तरी सूर्य चंद्रापेक्षा 400 पट दूर आहे. यामुळे सूर्य - चंद्राची बिंब साधारणपणे एकाच आकाराची दिसतात. यामुळेच चंद्रबिंब पूर्णपणे सूर्याला झाकू शकतं आणि खग्रास सूर्यग्रहण दिसते. मात्र चंद्र पृथ्वीपासून जसा जवळ-दूर जातो तसे त्याचा आकार लहान-मोठा दिसतो. चंद्र दूर गेल्यास सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाण्याऐवजी बिंबाचा मधला भाग झाकला जाऊन सूर्यबिंबाची कड प्रकाशित दिसते, यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहण पहाताना घ्यावयाची काळजी - 1 कंकणाकृती व खंडग्रास पहाताना दुर्बिणीतून अथवा बायनॉक्युलरमधून सूर्याकडे पाहू नका. 2 काळ्या केलेल्या काचा, गॉगल्स, एक्स-रे फिल्म, सीडी यांच्यामधून ग्रहण पाहू नये. 3 विशिष्ट आणि योग्य ग्रहण चष्मा वापरून ग्रहण पहा. कोणत्याही कारणास्तव नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नये. 4 ग्रहणाचे फोटो काढताना विशिष्ट फिल्टरचा उपयोग करूनच फोटो काढावेत अन्यथा डोळ्यांना इजा पोहोचू शकते. 5 गर्भवती महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनी देखील डोळ्यांची सुरक्षितता बाळगून ग्रहण पाहण्यास हरकत नाही. या ग्रहणानंतर अवघ्या सहाच महिन्यांनी म्हणजे 21 जून 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात कंकणाकृति सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतभर खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. त्यानंतर पुन्हा 21 मे 2031 रोजी दक्षिण भारतामध्ये कंकणाकृति सूर्यग्रहण दिसणार आहे.  चला तर मग ग्रहणाचा आनंद लुटू या...