Breaking News

चंगळवाद, स्वैराचार रोखायलाच हवा

भारताची संस्कृती महान असल्याचं आज कुणी म्हणत असेल तर कदाचित ते ऐकणार्‍याला नक्कीच हास्यास्पद वाटेल. याचं कारण देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या 70 वर्षातनंतरही आज देशातील महिला सुरक्षित नसताना या देशाची संस्कृती आजही महान असल्याचा डांगोरा कुणी पिटत असेल तर ते हास्यास्पद असल्याचं म्हणावं लागेल. एकेकाळी या देशातील समाज सुसंस्कृत, चारित्रसंप्पन्न असा होता. परंतु, अलिकडे चंगळवाद आणि स्वैराचार बोकाळलेल्या या देशात आमच्या आया-बहिणी सुरक्षित राहिल्या नाहीत, ही बाब आम्हांला चिंतेची वाटत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. देशात याआधी निर्भयासारख्या मानवतेला काळिमा फासणार्‍या अनेक घटना घडल्यात. त्या-त्या वेळी देशातील जनतेनं अशा घटनांवर संताप व्यक्त करुन वेगवेगळ्या मार्गानं निषेध सुध्दा केला आहे. काही प्रकरणांमध्ये नराधमांना न्यायालयाने शिक्षा सुध्दा ठोठावल्या आहेत. पण, म्हणून अशा प्रकारच्या क्रुर घटना थांबल्यात का? याचं उत्तर नाही, मुळीच नाही, असंच असेल. आताही हैद्राबाद येथे निर्भया घटनेची आठवण करुन देणारी अत्यंत क्रुर घटना घडली आहे. हैद्राबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. नराधमांनी नंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. अत्यंत क्रुर आणि संतापजनक ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली. सर्वसामान्यांसह राजकीय व्यक्ती, सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करुन आरोपींना शोधून काढून फासावर लटकवा, अशी मागणी केली. सोशल मीडियावर तर प्रचंड संताप व्यक्त करणार्‍या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाउस पडला. अभिनेता सुबोध भावे यांनी दिलेली प्रतिक्रिया यातील गांभीर्य अधोरेखित करणारी अशीच आहे. सुबोध भावे यांनी घटनेवर भाष्य करत ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ज्या छोट्याशा अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करुनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
 याप्रकारे देशातील अनेकांनी संताप व्यक्त करीत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन चार आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पीडित महिलेचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करीत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्‍वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन त्या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित महिलेला जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी संगनमताने कट रचून तिच्या स्कुटीच्या टायरमधली हवा सोडली होती. ज्या चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं ते सर्वजण तरुण आहेत. मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलु आणि शिवा अशी त्यांची नावे आहेत.  या नराधमांनी सामुहिक अत्याचार करुन पीडिताला मारुन टाकलं. त्यानंतर तिचा मृतदेह एका ट्रकमध्ये ठेवून महामार्गावर जावून एका पेट्रोलपंपावरुन पेट्रोल आणि डिझेल घेतलं. त्यानंतर निर्जनस्थळी जावून नराधमांनी महिलेचा मृतदेह जाळून टाकला. मन सुन्न करणार्‍या या घटनेने देश हादरुन टाकला. लोकांनी हळहळ व्यक्त केली, निषेध नोंदवला. आणखी काही दिवस हे असंच चालू राहील. यथावकाश लोक हळुहळू हे प्रकरण विसरतील. सरकारने या घटनेतील आरोपी नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचं असून ती जरुर उचलली जातीलही. परंतु, अशा प्रकारच्या घटना समाजात घडताच कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकविसाव्या शतकाकडे आम्ही आलो असताना आजही आमचं वर्तन पशुला लाजवेल असं होत असेल तर ही बाब निश्‍चितच चिंताजनक आहे. समाज केवळ शिक्षित होवून चालणार नाही, तो खर्‍या अर्थाने सुसंस्कृत झाला पाहिजे. तरच अशा प्रकारच्या अमानवी घटनांना पायबंद बसेल. केवळ कायदे असून किंवा कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली तर त्याचा आपल्या देशात फारसा उपयोग होईल, असं आम्हांला तर वाटत नाही. जगभरातील कित्येक देशात अत्यंत कडक शिक्षा अशा नराधमांना देण्याची व्यवस्था आहे. काही देशांमध्ये तर भरचौकात असे कृत्य करणार्‍या नराधमांची कत्तल केली जाते. अत्यंत कठोर शिक्षा ज्या देशात केल्या जातात त्या देशातील लोक निश्‍चितच असे कृत्य करण्यास धजावत नसणार. आपल्याकडे अशा प्रकारच्या शिक्षेची व्यवस्था होणार नाही, हे निश्‍चित. लोकशाही असलेल्या आपल्या देशात कायदा, न्यायव्यवस्थेद्वारा अशा घटनांवर शिक्षेची तजवीज केलेली आहे.
त्यानुसार कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. परंतु, आजही आपल्या समाजमनावर कायद्याचा जितका असायला पाहिजे तितका वचक नाही, हे अगदी खरं आहे. मग, अशा परिस्थितीत मानवतेला काळिमा फासणार्‍या घटना रोखणार तरी कशा, असा प्रश्‍न उपस्थिीत होणं स्वाभाविक आहे. यावर एकच जालीम उपाय होवू शकतो. तो म्हणजे समाज खर्‍या अर्थाने सुसंस्कृत झाला पाहिजे. समाजाला दुसर्‍याचा आदर करण्याचं, त्याग संस्कृतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आमच्या देशात पुर्वीचा पिढ्या, समाज खरोखरच सुसंस्कृत होता. त्याबद्दल कुणाचेही दुमत असणार नाही. मग तोच समाज, नवीन पिढ्या बरबादीच्या वाटेवर कशा पोहोचल्या याचं मूळ शोधण्याची गरज आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचा आमच्या मनामनावर आज असलेला पगडा, पाश्‍चात्यांच्या वागणुकीचं आम्ही केलेलं अंधानुकरण यातून आमच्यामध्ये शिरलेली मौजमस्तीची वृत्ती हेच आजच्या स्वैराचारापाठीमागचं प्रमुख कारण आहे. आज जेव्हा  परदेशी समाज मोठ्या संख्येने भारतात येवून स्थायिक होवू लागला आहे. हे परदेशी लोक आमच्या धर्माचे आचरण करु लागलेत. आमचं अध्यात्म, योगा आदी संस्काराचे धडे येथे गिरवू लागलेत. स्वैराचाराला कायमची मूठमाती देवून ते आमच्या देवदेवतांचे भजनातून गुणगाण करायला लागलेत. तेव्हा आम्ही काय करतोय? ज्यांचं अंधानुकरण आम्ही आज करतोय तेच जर आमच्या संस्कृतीवर फिदा झालेत तर आम्ही नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार देशातील प्रत्येकानं करायलाच हवा. आम्ही आमच्या रुढी-परंपरा, अध्यात्म, धर्म संस्कार याकडे कानाडोळा करतोय आणि त्यामुळेच आम्ही दिवसेंदिवस बिघडत चाललोय. हे असंच चालू राहिलं तर मानव जातीला काळिमा फासणार्‍या घटना घडतच राहणार. त्याला केवळ कायद्याच्या धाकाने पायबंद मुळीच घालता येणार नाही. आया-बहिणींना माता म्हणून संबोधणार्‍या या देशात पुन्हा संस्कार, त्यागवृत्ती, अध्यात्म रुजवलं पाहिजे. त्यासाठी केवळ सरकारने नव्हे तर संपूर्ण समाजाने प्रयत्न करायला हवे. अध्यात्म जीवन व्यथित करणार्‍यांकडे तुच्छतेनं बघण्याचं आम्ही सोडून द्यायलाच पाहिजे. जरुर अशा लोकांमध्येही वाईट प्रवृत्ती असतीलही. पण, म्हणून तो मार्ग स्वीकारुच नये, असं म्हणणं चुकीचं ठरु शकेल. देशातील महिला सुरक्षित राहण्यासाठी देश खर्‍या अर्थाने सुसंस्कृत झालाच पाहिजे.