Breaking News

झाड हे पावसाचे एटीएम


चापडगाव/ प्रतिनिधी ः
झाड हे पावसाचे एटीएम आहे. झाडांशिवाय पुढील काळात पाऊस पडणे शक्यच नाही. त्यामुळे सर्वांनी झाडे लावून पर्यावणाचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त भास्करराव पेरे यांनी केले.
शेवगावचे आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालय व आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी यांच्या वतीने गोळेगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, गुरुकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब फुंदे, गोळेगावचे सरपंच विजय साळवे, उपसरपंच मुक्ता आंधळे, संजय आंधळे, प्राचार्य सुधीर बांगर यावेळी उपस्थित होते.
पेरे म्हणाले, स्वयंसेवकांनी सात दिवसात ग्रामस्वच्छतेबरोबर जे इतर काम केले त्या सर्वांचे अभिनंदन करतो. थोडेसे वाचून खूप काही करायचे हा माझा स्वभाव आहे. माझ्या पाटोदा गावात मी 100 टक्के जमीन आज बागायत केली आहे. गावाला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. अडीच कोटीचे धनादेश गावाला मिळाले आहेत. सर्व राज्यात व देशात जाऊन मी ग्रामविकासाला सहकार्य करत असतो. परमेश्‍वराने खूप दिले कशाचेच कमी नाही. गावाच्या विकासासाठी स्वच्छ पाणी, ग्रामस्वच्छता, पाणी जमिनीत मुरवणे, फळझाडे लावणे व मुलांचे शिक्षण या पाच बाबींवर भर देण्यात येत आहे. सगळीकडेच असे झाल्यास डॉ. अब्दुल कलाम म्हणतात त्याप्रमाणे भारत महासत्ता होईल. समाज विकासाकडे जाईल असे काहीतरी करा. झाडे लावून पर्यावरण जपा. ज्ञानेश्‍वरी वाचा, त्यात विज्ञान भरले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज दुसर्‍यासाठी जगले त्यांचा आदर्श घ्या. पाणी वाया घालवू नका. सप्ताह घातल्याने पाऊस पडत नाही,  असे सांगून स्वतःच्या गावातील सुविधांची त्यांनी माहिती दिली.
                 शिबिरात ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त गाव जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, स्मशानभूमी स्वच्छता, 41 कुटुंबाचे लघुपट तयार करून सोशल मीडियावर लोकार्पण, इतिहासलेखन, सामाजिक सर्वेक्षण,  आधारकार्ड दुरुस्ती शिबिर, वृद्धासाठी एस.टी.पास सुविधा शिबिर, फॉगिंग मशिनद्वारे डास निर्मूलन मोहीम, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्मारक परिसर स्वच्छता, शोषखड्डे असे उपक्रम यावेळी राबवण्यात आले.