Breaking News

आदिवासी लोकांना जातीचे दाखले द्यावेत लोकशिक्षण प्रतिष्ठानची मागणीकोळगाव/ प्रतिनिधी :
नगर जिल्ह्यातील भटके, विमुक्त आणि आदिवासी समाजातील लोकांना जातीचे दाखले देण्याची मागणी लोकशिक्षण प्रतिष्ठानने केली आहे. आपण याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद काळे यांनी सांगितले.
काळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये भटके-विमुक्त तथा आदिवासी समाजातील प्रामुख्याने पारधी, भिल्ल जातींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दारिद्य्र, शिक्षणाचा अभाव, उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव यामुळे हा समाज सतत भटकंती करत आला आहे. तसेच उच्चभ्रू समाजाकडून सतत गुन्हेगारीचा शिक्का माथी मारल्यामुळे या समाजातील व्यक्तींना आजही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थैर्य लाभलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मूळ रहिवासी असल्याबाबतचे नागरिकत्वाचे पुरावे उपलब्ध नसतात. शासनाने स्थानिक चौकशीच्या आधारे उपरोक्त जातीच्या व्यक्तींना जातीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही, असे काळे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी सांगितले की,  शाळा, कॉलेजला जाणारे उपरोक्त जातीचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. तसेच शासनाच्या वैयक्तिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
      निवेनदनावर संस्थेचे संचालक राजेंद्र राऊत, पारधी समाजाचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब बळे, मानव अधिकार जनआंदोलनचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, जयश्री काळे, योगेश खेंडके, दिगंबर काळे, सागर लाळगे यांच्या सह्या आहेत.