Breaking News

ब्रिटीशकालीन आयपीसी सीआरपीसीत बदल करण्याचे अमित शहांचे सुतोवाच

Amit Shah
लखनौ
केंद्र सरकार भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी आणि सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसीजर कोडमध्ये बदल करणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय गृहमंञी अमित शहा यांनी केले आहे.
पोलीस विज्ञान कॉंग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आयपीसी आणि सीआरपीसीविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, काळाप्रमाणे आयपीसी आणि सीआरपीसी बदलण्याची गरज आहे. जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा हे कायदे बनविलेले होते. त्यांचे प्राधान्य भारताचे नागरिक नव्हते. आता आपण स्वतंत्र आहोत, लोकांच्या सोयीनुसार ते कायदे बदलण्याची गरज आहे.पोलिसांकडे लोकांचा दृष्टीकोन आणि पोलिसांचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. लोक दिवाळी साजरी करतात पोलीस मात्र आपले कर्तव्य बजावत असतात. लोक रजा घेतात आणि घरी जातात, होळी खेळतात, परंतु सर्वांच्या सुरक्षेची खबरदारी पोलिस कर्मचारी घेतात. पोलिस विभागाच्या 35 हजार कर्मचाऱ्यांनी आपले हौतात्म्य दिले आहे. पोलिसांमुळेच या देशातील जनतेला सुरक्षित वाटते. म्हणूनच नागरिकांनी आणि पोलिसांनी दोघांनीही एकमेकांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी माहिती देताना अमित शहा म्हणाले की, जेव्हा मोदी सरकार केंद्रात आले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जगातील 11 व्या स्थानावर होती पण आता ती सातव्या स्थानावर आहे. भारताची 130 कोटी लोकसंख्या ही संपूर्ण जगासाठी मोठी बाजारपेठ आहे.
पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे की 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन असावी. त्यासाठी चांगल्या कायदा व सुव्यवस्थेची आवश्यकता आहे जी केवळ कार्यतत्पर पोलिसांद्वारेच मिळू शकते. केंद्र सरकार फॉरेन्सिक विद्यापीठ तयार करणार आहे जेणेकरून पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होऊ शकेल.
पोलिस विज्ञान कॉंग्रेसचा हा 47 वा कार्यक्रम आहे. 1960 पासून असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आतापर्यंत यापैकी किती प्रस्तावांची अंमलबजावणी झाली आहे यावर एक कार्यक्रम आयोजित झाला पाहिजे असा प्रस्तावही अमित शहा यांनी यावेळी मांडला.