Breaking News

हुतात्मा जोतीबा चौगुलेला साश्रू नयनांनी निरोप

कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना हुतात्मा झालेले कोल्हापूरचे सुपुत्र जोतिबा चौगुले यांच्यावर बुधवारी उंबरवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी जमलेल्या नागरीकांना ‘भारत माता की जय’, ‘अमर रहे, जोतिबा चौगुले अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. जोतिबा चौगुले हे कोल्हापूरातील गडहिंग्लज तालुक्यात उंबरवाडी गावचे होते. जोतिबा चौगुले दोन महिन्यापूर्वीच गावी आले होते. जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. सोमवारी राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे हुतात्मा झाले. हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांचे पार्थिव मंगळवारी आणले जाणार होते. मात्र जम्मू-काश्मीरमधील ढगाळ हवामानामुळे पार्थिव आणता आले नाही. मंगळवारी रात्री उशिरा सैन्य दलाच्या खास विमानाने पार्थिव पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथे जवानांकडून सलामी दिल्यानंतर लष्करी रुग्णवाहिकेतून कोल्हापूरातील त्यांच्या मुळगाव उंबरवाडीमध्ये सकाळी सात वाजता पार्थिव दाखल झाले. दरम्यान, उंबरवाडीमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शहीद जवान जोतिबा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आसपासच्या गावकर्‍यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. ’शहीद जोतिबा चौगुले अमर रहे अमर रहे’ अशा घोषणा देत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.