Breaking News

'गायत्री'ची वाहतूक शेतकऱ्यांसाठी मनस्ताप कोपरगाव / ता.प्रतिनिधी
 शासनाचा प्रकल्प असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणाने सध्या कोपरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरत आहे. हे काम सुरु असताना होणारी वाहतूक याचे मूळ कारण आहे. या वाहनांमुळे वीज तारा आणि रोहित्र नेहमीच तुटले जात आहे. त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, अशी तक्रार सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक अरुण येवले यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे , संबंधित मंत्र्यांकडे, माजी आ. कोल्हे यांच्याकडे केली आहे. 
 तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे परिसरात गट नंबर २२५ , २२९,  २३०
मध्ये शेती असून त्यातील २५ अश्वशक्तीचे वीजपंप, संबंधित यंत्रणा गायत्री कन्स्ट्रक्शन च्या अवजड वाहनांनी तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत ठेकेदारांकडे तक्रार केल्यास अरेरावीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळतात. जेऊर कुंभारी, दर्ड चांदवड, चांदेकसारे, डाऊच, घारी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. दोन महिन्यापासून वीज रोहित्र नादुरूस्त असल्याने रब्बी पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या समृद्धी महामार्गाचे वीज संदर्भातील कामे ठेकेदार जपे व कापसे यांनी घेतले होते. पण त्यांनी काम सोडल्याचे समजते. त्यामुळे या नुकसानग्रस्त वीज रोहित्राची दुरुस्ती होत नाही. राज्य रस्ते महामंडळ आता नव्याने ठेकेदाराची नेमणूक करणार असल्याचे समजते, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा गायत्री कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराने  तत्काळ  नुकसानग्रस्त  रोहित्रांची दुरुस्ती करून नव्याने तारा बसून द्याव्यात, अन्यथा याविरुद्ध उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असेही तक्रारीत म्हटले आहे.